पुणे, पुढारी वृत्तसेवा : काँग्रेसचे माजी खासदार सुरेश कलमाडी यांचे बंधू श्रीधर कलमाडी यांच्या बाणेर येथील सदनिकेवर डल्ला मारून चोरट्यांनी चोरट्यांनी 72 लाख 93 हजार 777 रुपयांचा ऐवज चोरी केला. त्यामध्ये रोकड, हिरे, मोतीजडीत दागिन्यांचा समावेश आहे. याप्रकरणी श्रीधर शामराव कलमाडी (वय ७४, रा.बाणेर) यांनी फिर्याद दिली आहे. त्यानुसार अज्ञात चोरट्यांच्या विरुद्ध चतुःश्रृंगी पोलिसांनी घरफोडीचा गुन्हा दाखल केला आहे. ही घटना रविवारी रात्री सायंकाळी सहा ते रात्री साडे दहाच्या सुमारास बाणेर रोड वरील श्रीधर कलमाडी यांच्या सदनिकेत घडली.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी हे काँग्रेसचे माजी खासदार सुरेश कलमाडी यांचे बंधू असून, त्यांचे साई सर्व्हिस नावाने गाड्यांचे शोरुम आहे. रविवारी रात्री फिर्यादी व त्यांच्या पत्नी घर बंद करून त्यांच्या नातेवाईकांकडे जेवणासाठी गेले होते. त्यावेळी चोरट्यांनी घराच्या खिडकीची जाळी फाडून दरवाजाची कडी काढली. त्यानंतर खिडकीतून घरात प्रवेश करून ५० हजारांची रोकड व हिरे,मोती जडीत दागिने असा ऐवज चोरी केला.
नातेवाईकांच्या घरातून फिर्यादी परतले तेव्हा त्यांना घरात चोरी झाल्याचे समजले. त्यांनी याबाबत पोलिसांना माहिती दिल्यानंतर घटनास्थळाची पाहणी करून पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. पुढील तपास सहायक पोलिस निरीक्षक राजेश माळगावे करीत आहेत.