पुणेः खराडीमधील तुळजा भवानीनगर परिसरात असलेले घड्याळांचे बंद दुकान फोडून चोरट्यांनी विविध कंपन्यांचे महागडे ११ लाखांचे घड्याळ चोरून नेल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. चोरट्यांकडून बंद फ्लॅटसोबत आता बंद दुकाने देखील फोडली जाऊ लागली आहेत. सोमवारी सकाळी हा प्रकार उघडकीस आला आहे. (Latest Pune News)
याप्रकरणी ५० वर्षीय व्यक्तीने खराडी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानूसार, पोलिसांनी अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा नोंद केला आहे. पोलिसांच्या माहितीनुसार, फिर्यादी यांचे खराडीतील जय भवानीनगर परिसरात घड्याळांचे दुकान आहे. त्यांच्याकडे सर्व प्रकारचे घड्याळ विक्रीस आहेत. काही महागडी घड्याळे देखील त्यांच्या दुकानात विक्रीस ठेवण्यात आलेली होती.
दरम्यान, नेहमीप्रमाणे शनिवारी ते दुकान बंदकरून गेल्यानंतर अज्ञात चोरट्यांनी मेन कांऊटरचे मागील बाजूस असलेल्या स्लायडींग विंडोचे लोखंडी ग्रील कशाचे तरी सहाय्याने कापून त्यावाटे दुकानामध्ये प्रवेश केला. तसेच, दुकानातील विक्रीस ठेवलेले ११ लाख ७ हजार रुपयांची महागडे घड्याळ चोरून पोबारा केला. तक्रारदार सोमवारी सकाळी दुकान उघडण्यास आल्यानंतर हा प्रकार उघडकीस आला आहे. अधिक तपास खराडी पोलिस करत आहेत.
इंटेरिअरचे काम करणाऱ्यानेच मारला डल्ला
विमानतळ परिसरात फ्लॅटचे इंटेरिअरचे काम सुरू असताना येथील कामगारानेच बॅगेत ठेवलेले दागिने आणि रोकड असा ४ लाख ५५ हजारांचा ऐवज चोरून नेल्याचा प्रकार समोर आला आहे. याप्रकरणी विमानतळ पोलिसांत संबंधित कामगारावर गुन्हा नोंद करण्यात आला आहे. याबाबत ४६ वर्षीय महिलेने फिर्याद दिली आहे.
फिर्यादी यांचा लोहगाव येथील पाटील वस्ती रोडवर एका इमारतीत फ्लॅट आहे. या फ्लॅटमध्ये इंटेरिअरचे काम सुरू होते. काही कामगार काम करत होते. दरम्यान, फिर्यादी यांनी एक बॅग आणली होती. त्यात ३० हजारांचे दागिने व इतर रोकड होती. कामगाराने फिर्यादींची नजर चुकवून त्यांच्या बॅगेतील ऐवज चोरून पोबारा केला.