पुणे: ढोल-ताशा गजरात वाजतगाजत निघालेल्या मिरवणुका, सनई-चौघड्यांचे मंजुळ स्वर, प्रवेशद्वारावर रांगोळीच्या पायघड्या, फुलांची अन् रंगबिरंगी पताक्यांची सजावट अन् विद्युतरोषणाई... अशा चैतन्यपूर्ण वातावरणात मंदिरांमध्ये शारदीय नवरात्रोत्सवास सोमवारी (दि. 22) सुरुवात झाली.
शहर आणि उपनगरातील मंदिरांमध्ये सकाळी विश्वस्त, पदाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत विविधत-पारंपरिक पद्धतीने झालेली घटस्थापना करण्यात आली अन् ‘उदे ग अंबे उदे’चा जयघोष सगळीकडे दुमदुमला. (Latest Pune News)
पहिल्याच माळेला भाविकांनी दर्शनासाठी गर्दी केली, पावसाच्या सरीतही भाविकांच्या उत्साहात कमतरता नव्हती. पावसातही मंदिरांमध्ये दर्शनासाठी भाविक येत होते. मंदिरांमध्ये दिवसभर धार्मिक-सांस्कृतिक कार्यक्रमांची रेलचेल होती. आदिशक्तीच्या आगमनाने सगळीकडे आनंद अन् उत्साह पाहायला मिळाला. नवरात्रोत्सव म्हणजे चैतन्यमयी पर्व. याच आनंदमयी पर्वानिमित्त शहर आणि मंदिरांमध्ये सोमवारी हर्षोल्हासाचे वातावरण रंगले.
पुण्यातील प्राचीन देवीच्या मंदिरांमध्ये फुलांचे तोरण, रांगोळीच्या पायघड्या, रंगबिरंगी पताक्यांची सजावट, सनई-चौघड्यांचे स्वर, मंत्रोच्चराने आणि भक्तिगीतांनी प्रसन्न झालेले वातावरण पाहायला मिळाले. बँड पथकांचे उत्कृष्ट वादन, ढोल-ताशांचा गजरात निघालेल्या मिरवणुकांनी लक्ष वेधले. मंदिरांत मान्यवरांच्या हस्ते देवीला अभिषेक, पूजा, महावस्त्र अर्पण करून सकाळी विधिवत आणि पारंपरिक पद्धतीने घटस्थापना करण्यात आली. देवीचे विलोभनीय रूप लक्ष वेधून घेत होते.
त्यानंतर दिवसभर भजन-कीर्तनाचे, प्रवचनांचे आणि भक्तिगीतांचे कार्यक्रम रंगले. सकाळी झालेली भाविकांची गर्दी रात्रीपर्यंत सुरूच होती. महालक्ष्मी मंदिर (सारसबागेसमोर), पद्मावतीदेवी मंदिर (पुणे-सातारा रस्ता), तळजाईमाता देवस्थान अशा विविध मंदिरांमध्येही नवरात्रोत्सवानिमित्त वैविध्यपूर्ण कार्यक्रम आयोजित केले होते आणि भाविकांनी दर्शनासाठी गर्दी केली.
चतु:शृंगी मंदिर देवस्थान (सेनापती बापट रस्ता)
चतुःशृंगी मंदिरात शारदीय नवरात्रोत्सवाला पारंपरिक पद्धतीने आणि उत्साहात सुरुवात झाली. सकाळी नऊ वाजता मंदिर व्यवस्थापक विश्वस्त रवींद्र अनगळ यांच्या हस्ते घटस्थापना करण्यात आली. त्यानंतर अभिषेक, रुद्राभिषेक, महावस्त्र अर्पण आणि महापूजा, महाआरती झाली. या सर्व पूजेचे पौरोहित्य श्रीराम नारायण कानडे गुरुजी यांनी केले. पहाटेपासून भाविकांनी मंदिरात दर्शनासाठी मोठी गर्दी केली.
ग्रामदेवता तांबडी जोगेश्वरी मंदिर
मंदिरामध्ये विधिवत आणि पारंपरिक पद्धतीने सोमवारी घटस्थापना करण्यात आली. यानिमित्त मंदिरात आकर्षक फुलांची सजावट करण्यात आली. पहिल्याच दिवशी भाविकांनी दर्शनासाठी गर्दी केली आणि देवीकडे आयुष्यात सुख-समृद्धी आणि मांगल्य नांदण्याची कामना केली. मंदिरात नवरात्रोत्सवाचा उत्साह पाहायला मिळाला.
भवानी देवी मंदिर (भवानी पेठ)
फुलांच्या आकर्षक सजावटीने सर्वांचे लक्ष वेधले. मंदिरात सकाळी महारुद्राभिषेक, महापूजा झाली. त्यानंतर तुकाराम दैठणकर यांचे सुरेल सनईवादन झाले आणि त्यानंतर विधिवत आणि पारंपरिक पद्धतीने घटस्थापना करण्यात आली. भजन-कीर्तनाच्या कार्यक्रमांनी चैतन्यपूर्ण वातावरण रंगले. भाविकांनी देवीचे दर्शन घेत प्रार्थना केली.
काळी जोगेश्वरी मंदिर (बुधवार पेठ)
सकाळी पारंपरिक आणि विधिवत पद्धतीने घटस्थापना करण्यात आली. भाविकांनी दर्शनासाठी गर्दी केली आणि धार्मिक-सांस्कृतिक कार्यक्रमांनी मंदिरात चैतन्यपूर्ण वातावरण निर्माण झाले. प्रत्येक कार्यक्रमात भाविकांचा उत्स्फूर्त सहभाग पाहायला मिळाला.
पिवळी जोगेश्वरी मंदिर (शुक्रवार पेठ)
मंदिरात विधिवत पद्धतीने सकाळी साडेदहा वाजता दिनेश कुलकर्णी यांच्या हस्ते घटस्थापना करण्यात आली. भजन-कीर्तनाचे कार्यक्रम यानिमित्त रंगले. भाविकांनी मंदिरात दिवसभर दर्शनासाठी गर्दी केली.
वनदेवी मंदिर (कर्वेनगर)
मंदिरात परंपरेप्रमाणे कर्वेनगर भागात मिरवणूक काढण्यात आली. विधिवत-पारपंरिक पद्धतीने घटस्थापना करण्यात आली. यानिमित्त मंदिरात करण्यात आलेल्या सजावटीने लक्ष वेधले. भजन-कीर्तनाचे कार्यक्रम मंदिरात झाले.