पुणे: पुणे पोलिसांनी आंदेकर टोळीच्या मुसक्या आवळायला सुरुवात केली आहे. नाना पेठेतील आंदेकर टोळीच्या अवैध बांधकामावर पोलिसांनी हातोडा मारला आहे. येथील अनधिकृत फ्लेक्स आणि बांधकामे महापालिका आणि पोलिसांनी सोमवारी (दि. 22) केलेल्या संयुक्त कारवाईत काढून टाकण्यात आली. यासंदर्भात पालिकेच्या अधिकाऱ्यांना विचारले असता, त्यांनी माहिती देण्यास टाळले.
आयुष कोमकर खून प्रकरणानंतर बंडू आंदेकर आणि त्यांच्या कुटुंबीयांकडून पुण्यातील नाना पेठ परिसरात उभारण्यात आलेली अनधिकृत बांधकामे आणि होर्डिंग्जवर महापालिकेच्या पथकाने कारवाई केली. शहरातील विविध भागांत अतिक्रमण कारवाई केल्यावर महापालिकेच्या अतिक्रमण व बांधकाम विभागाकडून त्याची अधिकृतपणे माहिती देण्यात येते. (Latest Pune News)
मात्र, सोमवारी झालेल्या कारवाईची माहिती अधिकाऱ्यांना वारंवार विचारून देखील देण्यात आली नाही. अतिक्रमण विभागाच्या अधिकाऱ्यांनी भवानी क्षेत्रीय कार्यालयाकडे याची माहिती असल्याचे सांगितले, तर सहाय्यक आयुक्त किसन दगडखैर यांनी कारवाई झाल्याचे मान्य केले. मात्र, नेमकी कारवाई काय केली, याची माहिती दिली नाही.
बेकायदा उभारलेले वनराज आंदेकर स्मृतिस्थळही उद्ध्वस्त
पुणे महानगरपालिका आणि पुणे पोलिसांनी संयुक्त मोहीम राबवून आंदेकर टोळीच्या प्रभावक्षेत्रातील अतिक्रमणांवर कारवाई करण्यात आली. यात वनराज आंदेकर यांची हत्या ज्या चौकात झाली होती, तेथे त्यांच्या कार्यकर्त्यांनी उभारलेले बेकायदा स्मृतिस्थळसुद्धा उद्ध्वस्त करण्यात आले. येथे वनराज आंदेकरच्या या फोटोसह केलेले सुशोभीकरण आणि येथे उभारलेला त्याचा लोखंडी फ्लेक्सही काढून टाकण्यात आला.
त्याचबरोबर आंदेकर टोळीच्या दहशतीचा गैरफायदा घेत नाना पेठेतील संत कबीर चौक, मासळी बाजार व परिसरातील वस्तीत मोठ्या प्रमाणात अतिक्रमणे करण्यात आली आहेत. रस्त्यावर बेकायदा स्टॉल, टपऱ्या सुरू झाल्या आहेत. परिणामी, येथे वाहतूक कोंडी होत होती. अखेर सोमवारी भवानी पेठ क्षेत्रीय कार्यालय व मुख्य अतिक्रमण विभाग, आकाशचिन्ह विभाग, बांधकाम विभागाने अखेर येथील अतिक्रमण व अवैध बांधकामांवर कारवाई केली.