Pune Synthetic Track Children Restriction Pudhari
पुणे

Pune Synthetic Track Children Restriction: पुण्यातील सणस मैदानावर मुलांना बंदी; मात्र महापौर-खासदार स्पर्धांसाठी उघडे

क्रीडा विभागाच्या दुटप्पी धोरणामुळे पालकांमध्ये संताप, लहान मुलांच्या सरावावर प्रश्नचिन्ह

पुढारी वृत्तसेवा

पुणे: सारसबागेजवळील कै. बाबूराव सणस मैदानावर मंगळवारी महापौर चषक क्रीडा स्पर्धेचा उद्घाटन सोहळा मोठ्या थाटात पार पडला. मात्र, याच मैदानावरील सिंथेटिक ट्रॅक खराब होतो, असे कारण देत 10 वर्षांखालील मुलांना प्रवेशबंदी घालणाऱ्या महापालिकेच्या क्रीडा विभागाच्या भूमिकेवर आता प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे.

महापालिकेने 2006 साली सारसबागेजवळील सुमारे सात एकर जागेवर कै. बाबूराव सणस क्रीडांगण विकसित केले. शहरात गुणवंत ॲथलेटिक्स खेळाडू तयार व्हावेत, या उद्देशाने येथे 400 मीटर लांबीचा आंतरराष्ट्रीय दर्जाचा सिंथेटिक ट्रॅक उभारण्यात आला. मैदानावर लांब उडी व तिहेरी उडीसाठी स्वतंत्र पिट, तसेच भालाफेक, गोळाफेक, थाळीफेक, पोल व्हॉल्ट आणि स्टेपलचेज यांसाठी आवश्यक सुविधा तयार करण्यात आल्या आहेत.

अलीकडेच महापालिकेच्या भवन विभागाने सुमारे 8 कोटी रुपये खर्च करून 400 मीटरचा आठ लेनचा सिंथेटिक ट्रॅक नूतनीकरण केला. ट्रॅकच्या आतील भागातील मैदानावर लॉनही विकसित करण्यात आले आहे. महापालिकेच्या 2013 च्या क्रीडा धोरणानुसार या मैदानाचा वापर केला जातो. मात्र, क्रीडा विभागाने ‌‘लहान मुलांच्या वापरामुळे ट्रॅक खराब होतो,‌’ असे कारण देत 10 वर्षांखालील मुलांना मैदानावर प्रवेशबंदी लागू केली. या निर्णयाविरोधात पालक आणि विविध संघटनांनी नाराजी व्यक्त करीत बंदी मागे घेण्याची मागणी केली होती. तरीही या मागणीवर अद्याप निर्णय झालेला नाही.

मंगळवारी इथे महापौर चषक क्रीडा स्पर्धेचा उद्घाटन सोहळा पार पडला. कार्यक्रमासाठी सिंथेटिक ट्रॅकवर झाडांच्या कुंड्या ठेवल्या होत्या. मैदानाच्या आत मोठा स्टेज उभारून लाइटिंग आणि एलईडी स्क्रीनची व्यवस्था केली होती. या तयारीसाठी कामगार आणि उपस्थितांची मोठी वर्दळ ट्रॅकवर होती. त्यामुळे, मुलांच्या शूजमुळे ट्रॅक खराब होतो, असे सांगत प्रवेशबंदी घालणाऱ्या क्रीडा विभागाने कार्यक्रमाच्या तयारीदरम्यान ट्रॅकचे संरक्षण करण्यासाठी कोणती खबरदारी घेतली? तसेच अशा कार्यक्रमांसाठी शहरातील इतर मैदाने उपलब्ध असताना सणस मैदानाची निवड का करण्यात आली, असे प्रश्न उपस्थित केले जात आहेत.

लहान मुलांच्या शूजमुळे सिंथेटिक ट्रॅक खराब होतो, असे कारण देत 10 वर्षांखालील मुलांना मैदानावर बंदी घालण्यात आली. मात्र, खासदार चषक आणि महापौर चषक स्पर्धांसाठी त्याच मैदानाचा वापर केला जातो. मुलांना सरावासाठी बंदी, पण स्पर्धा आणि कार्यक्रमांसाठी परवानगी हा क्रीडा विभागाचा दुटप्पीपणा आहे.
अनंत घरत, प्रसिद्धी प्रमुख, शिवसेना (उबाठा)

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT