Swine Flu H1N1 Pudhari
पुणे

Pune Swine Flu Cases: स्वाइन फ्लूच्या रुग्णसंख्येत पुणे राज्यात आघाडीवर; दहा महिन्यांत तिघांचा मृत्यू

पुणे महापालिका हद्दीत ८७९ रुग्णांची नोंद; मुंबईत ६४८, तर नागपुरात ४९३ रुग्ण आढळले

पुढारी वृत्तसेवा

पुणे: डेंग्यूच्या वाढत्या रुग्णसंख्येने पुणेकर हैराण असतानाच आता स्वाइन फ्लूनेही पुणेकरांची डोकेदुखी वाढवली आहे. शहरात डेंग्यूसोबतच स्वाइन फ्लूचा प्रादुर्भावही कायम असून, राज्यात स्वाइन फ्लू प्रादूर्भावातही पुणेच पुढे असल्याचे आरोग्य विभागाच्या आकडेवारीतून समोर आले आहे.

जानेवारी ते ऑक्टोबर या १० महिन्यांत पुणे महापालिका हद्दीत ८७९ रुग्णांची नोंद झाली असून, तिघांचा मृत्यू झाला आहे. त्यामुळे एकीकडे डेंग्यूचे आव्हान आणि दुसरीकडे स्वाइन फ्लूचा वाढता धोका, अशा दुहेरी संकटाचा सामना पुणेकरांना करावा लागत आहे. पुण्यापाठोपाठ मुंबई आणि नागपूरमध्ये सर्वाधिक रुग्णांची नोंद करण्यात आली आहे. आरोग्य विभागाच्या आकडेवारीनुसार जानेवारी ते ऑक्टोबर या कालावधीत राज्यभरात १३ लाख १० हजार ४४३ जणांची तपासणी केली. यामध्ये ४३७५ संशयित रुग्ण आढळून आले, तर २८५८ जणांना स्वाइन फ्लूची लागण झाल्याचे निष्पन्न झाले असून, ३४ जणांचा मृत्यू झाला आहे.

या एकूण आढळून आलेल्या रुग्णसंख्येत सर्वाधिक ७८९ रुग्ण पुणे महापालिका हद्दीतील आहेत. पुण्यापाठोपाठ मुंबईत ६४८, तर नागपुरात ४९३ रुग्णांची नोंद झाली आहे. याबरोबरच नाशिकमध्ये ३०६, कोल्हापूर जिल्ह्यात १२८, कोल्हापूर शहरात ७५, तर सोलापूरमध्ये ५६ रुग्ण आढळले आहेत. पिंपरी-चिंचवडमध्ये १५९ स्वाइन फ्लूचे रुग्ण आढळले. स्वाइन फ्लूपासून बचावासाठी अतिजोखमीच्या व्यक्तींसाठी मोफत आणि ऐच्छिक लसीकरण सुरू आहे. गर्भवती महिला, मधुमेह आणि उच्च रक्तदाब असलेल्या व्यक्ती, आरोग्य कर्मचार्‍यांना ही लस दिली जात आहे. इन्फ्लुएन्झा एच १ एन१ आणि एच ३ एन २ मुळे होणार्‍या मृत्यूंची नियमित तपासणी करण्याचे आदेश आरोग्य विभागाने दिले आहेत.

संशयित रुग्णांच्या चाचण्या, उपचार आणि औषधांची उपलब्धता यावर भर दिला जात असून, सरकारी आणि खासगी रुग्णालयांमध्ये या आजारावरील ऑसिल्टॅमिवीर औषधांचा पुरेसा साठा ठेवण्यात आला आहे. स्वाइन फ्लूच्या संशयित रुग्णांचे सर्वेक्षण, उपजिल्हा रुग्णालये, वैद्यकीय महाविद्यालयांमध्ये रुग्णांसाठी विलगीकरण कक्ष यासारख्या उपाययोजना राबवल्या जात असल्याचे आरोग्य विभागाने स्पष्ट केले आहे.

नागपूरमध्ये सर्वाधिक मृत्यूची नोंद

राज्यभरात स्वाईन फ्लूमुळे ३५ जणांचा मृत्यू झाला असून, नागपूरमध्ये सर्वाधिक २३ जणांचा मृत्यू झाला आहे. तसेच नाशिकमध्ये आठ, पुण्यात तीन, तर नवी मुंबईत एका रुग्णाचा मृत्यू झाला असल्याचे आरोग्य विभागाच्या अहवालात नमyद करण्यात आले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT