पुणे: स्वारगेट बसस्थानकावर बसची वाट पाहत थांबलेल्या महिला आणि त्यांच्या आठवर्षीय मुलीकडे अश्लील हावभाव करून मुलीला पैसे देण्याचा प्रयत्न करणाऱ्या एका व्यक्तीला स्वारगेट पोलिसांनी अटक केली.
सुभाष ज्ञानोबा मखरे (वय ४९, रा. आंबेगाव पठार, कात्रज) असे आरोपीचे नाव आहे. याप्रकरणी २६ वर्षीय महिलेने स्वारगेट पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. ही घटना गुरुवारी (दि. २ जुलै) सायंकाळी साडेपाचच्या सुमारास स्वारगेट बसस्थानकावर घडली.
पोलिसांच्या माहितीनुसार, फिर्यादी महिला आपल्या पती, काका आणि तीन मुलांसह मूळ गावी जाण्यासाठी स्वारगेट बसस्थानकावर आल्या होत्या. त्या वेळी त्यांचे पती आणि काका मुलांसाठी खाऊ आणण्यासाठी गेले होते.
या दरम्यान, सुभाष मखरेने फिर्यादी महिला आणि त्यांच्या आठ वर्षीय मुलीकडे पाहून अश्लील हावभाव केले. सुरुवातीला महिलेने त्याकडे दुर्लक्ष केले. मात्र, त्यानंतर आरोपी त्यांच्या पाठीमागे येऊन उभा राहिला आणि आठ वर्षीय मुलीला पैसे देण्याचा प्रयत्न करू लागला.
ही बाब महिलेच्या लक्षात येताच त्यांनी आरडाओरड केली. त्यानंतर आरोपीने तेथून पळून जाण्याचा प्रयत्न केला. मात्र, उपस्थित नागरिकांनी त्याला पकडून चोप दिला. या वेळी बसस्थानक परिसरात कर्तव्यावर असलेले पोलिस कर्मचारी संदीप घुले आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी आरोपी मखरेला ताब्यात घेऊन स्वारगेट पोलिस ठाण्यात आणले. पोलिसांनी त्याला अटक केली असून, पुढील तपास सुरू आहे.