स्वच्छ सर्वेक्षणात पुणे महापालिकेची एक इयत्ता पुढे; राज्यात दुसरा, तर देशात आठवा क्रमांक Pudhari
पुणे

Swachh Survekshan: स्वच्छ सर्वेक्षणात पुणे महापालिकेची एक इयत्ता पुढे; राज्यात दुसरा, तर देशात आठवा क्रमांक

पुढल्या वर्षी शहराला पहिल्या तीन क्रमांकांत आणण्याचा आयुक्तांचा निर्धार

पुढारी वृत्तसेवा

Pune Swachh Survekshan 2024 ranking

पुणे: स्वच्छ भारत अभियानातील स्वच्छ सर्वेक्षण स्पर्धेत गेल्या वर्षीच्या तुलनेत पुणे महानगरपालिका एक इयत्ता वर चढली आहे. गेल्या वर्षी या स्पर्धेत पालिका 9 व्या स्थानावर होती. यंदा पालिकेने 10 लाखांहून अधिक लोकसंख्येच्या शहरांत देशात 8 वा, तर राज्यात दुसरा क्रमांक मिळवला आहे. या सोबतच ‘वॉटर प्लस’ व कचरामुक्त शहरासाठी पंचतारांकित प्रमाणपत्रही पुणे महानगर पालिकेने पटकावले आहे.

स्वच्छ भारत अभियानातील स्वच्छ सर्वेक्षण स्पर्धेतील पुरस्कारविजेत्या शहरांची गुरुवारी नावे जाहीर करण्यात आली. या पुरस्काराचे वितरण दिल्लीत राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या उपस्थितीत करण्यात आले. या वर्षी ही स्पर्धा रिड्यूस, रीयूज, आणि रिसायकल या मुद्यांवर आयोजित केली होती. (Latest Pune News)

शहरात तीन पाळ्यांमध्ये झाडणकाम सुरू केले. घरोघरी कचरा संकलनदेखील वाढवले. कचरानिर्मितीच्या जागीच कचर्‍याचे वर्गीकरण बंधनकारक केले आहे. तर कचरा प्रक्रिया केंद्र अधिक सक्षम केले आहे.

अस्वच्छता पसरवणार्‍या विरोधात दंडात्मक कारवाई केली असून, गेल्या वर्षभरात 3 कोटींपेक्षा अधिक दंड वसूल केला आहे. सार्वजनिक स्वच्छतागृहांच्या स्वच्छतेची जबाबदारी खासगी क्षेत्राकडे दिली असून, याचा फायदा या स्पर्धेत झाल्याने 2024 च्या स्वच्छ सर्वेक्षणात पुणे शहराला देशात आठवे, तर राज्यात दुसरे मानांकन मिळाले, अशी माहिती घनकचरा विभागाचे उपयुक्त संदीप कदम यांनी दिली.

पालिकेची ही कामगिरी ठरली महत्त्वाची

  • साडेआठ लाख रहिवासी - व्यावसायिक मिळकतींतून थेट कचरासंकलन

  • शहरात रोज तब्बल 2200-2400 टन

  • कचरा गोळा करण्यात आला.

  • कचरानिर्मिती होत असलेल्या मूळ ठिकाणीच 98 टक्के कचर्‍याचे वर्गीकरण

  • रिड्यूस-रीयूज-रिसायकल केंद्रांची संख्या - 17

  • बाहेर कचरा टाकणार्‍यांवर कारवाईसाठी 18 स्कॉड

  • कचरासंकलन व वाहतुकीसाठीच्या

  • वाहनांची संख्या - 900

  • ओल्या कचर्‍यावरील प्रक्रियेसाठीचे

  • प्रकल्प 16, तर सुक्या कचर्‍यावरील प्रक्रियेसाठीचे 14 प्रकल्प

स्वच्छ सर्वेक्षणात गतवर्षीच्या तुलनेत पुण्याला आठवा क्रमांक मिळालेला आहे. मिळालेल्या क्रमांकापेक्षा पुणेकर कितवा नंबर देतात, हे महत्त्वाचे आहे. पुणे शहर नंबर एकचे शहर स्वच्छतेच्या बाबतीत होऊ शकते. त्याप्रमाणे आपली यंत्रणा कामाला लागली आहे. पुणेकरांच्या सहभागातून आपण नक्कीच नंबर एकवर जाऊ शकतो. या वर्षात यासंदर्भात काम करणार असून, पुणे नक्कीच पहिल्या तीन क्रमांकांत असेल.
- नवलकिशोर राम, आयुक्त पुणे महापालिका
स्वच्छ सर्वेक्षणात पुण्याला देशात 8वा, तर राज्यात दुसरा क्रमांक मिळाल्याबद्दल घनकचरा व्यवस्थापन विभागाच्या सर्व कर्मचार्‍यांचे व अधिकार्‍यांचे अभिनंदन. पहिल्या तीन क्रमांकांमध्ये स्थान पटकावण्यासाठी पुणे सक्षम आहे. तसेच पालिकेकडे पुरेशी संसाधनेही आहेत. येत्या काळात जुन्या साठलेल्या कचर्‍यावर प्रक्रिया व समाविष्ट गावांमधील स्वच्छतेकडे अधिक लक्ष देण्यात येईल.
- पृथ्वीराज बी. पी., अतिरिक्त आयुक्त

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT