पुणे: शिक्षणाचे माहेरघर आणि आयटीचे हब अशी ओळख असलेल्या पुरोगामी पुण्यावर अद्यापी जादूटोणा, अघोरी प्रथा अशा अंधश्रद्धेचा पगडा कायम आहे. महाराष्ट्र नरबळी व इतर अमानुष, अघोरी प्रथा आणि जादूटोणा प्रतिबंध कायद्यानुसार पुणे शहर व परिसरात गेल्या पाच वर्षांत पन्नासहून अधिक गुन्हे दाखल झाले आहेत. यावरूनही हेच स्पष्ट होते.
नाशिकजवळील मिरगावचा भोंदू अशोक खरातचे प्रकरण राज्यभर गाजत असतानाच माहिती अधिकार कार्यकर्ते सचिन नेलेकर यांनी पोलिसांकडून मिळविलेल्या माहितीमुळे पुण्यातील अंधश्रद्धेबाबतचे हे भयानक वास्तव समोर आले आहे. अंधश्रद्धाविरोधी कायद्यासाठी आयुष्यभर लढा देणाऱ्या डॉ. नरेंद्र दाभोलकर यांच्या पुण्यातच असे प्रकार सुरू आहेत, हे सहजासहजी कोणाला पटले नसते, पण दुर्दैवाने ही वस्तुस्थिती आहे, हे मान्य करावे लागते. ‘तुझी बायको अवदसा आहे... तिच्यामुळे तुझं राजकारण संपेल... तिला सोडचिठ्ठी दे,’ असा सल्ला देत एका ‘हायप्रोफाइल’ गुरूने विवाहित महिलेच्या आयुष्याशी खेळ केला होता. लिंबू उतरवणे, ग््राहदोष सांगणे आणि अघोरी विधी करण्याच्या नावाखालीही तिचा मानसिक छळ करण्यात आला होता. या प्रकरणात संबंधित गुरुजीला अटकही झाली. एका उच्चशिक्षित कुटुंबात घडलेली ही घटना पुण्यावरील अंधश्रद्धेच्या पगड्याची भीषणता अधोरेखित करणारी ठरली होती.
अंधश्रद्धाविरोधी कायदा अस्तित्वात येण्यापूर्वी चमत्कारांच्या नावाखाली लैंगिक अत्याचार आणि आर्थिक शोषणाचे प्रकार मोठ्या प्रमाणावर घडत होते. कायद्यामुळे त्यात काही प्रमाणात घट झाली असली तरीही अंधश्रद्धेचे पूर्णपणे निर्मूलन झालेले नाही, हेच पोलिसांकडे उपलब्ध आकडेवारी स्पष्ट करते. मुठा नदीपात्रात घडलेला अघोरी प्रकार काही महिन्यांपूर्वी उघडकीस आला होता. विशेष म्हणजे, ज्या परिसरात डॉ. नरेंद्र दाभोलकर यांची हत्या झाली, त्याच्याजवळच झालेल्या या जादूटोण्यामुळे खळबळ उडाली होती.
‘काळी जादू काढतो’ असे सांगून चंदननगरमधील एका कुटुंबाची फसवणूक करण्यात आली होती, तर कोरेगाव पार्कमध्ये ‘खजिना मिळवून देतो’ असे सांगत एका महिलेला लाखोंना गंडा घालण्यात आला होता. कोथरूडमध्ये आयटी इंजिनीअर असलेल्या एका दाम्पत्याला तब्बल 13-14 कोटी रुपयांना गंडा घातल्याचेही उघड झाले होते. हडपसरमध्ये महिलेला नग्न झोपवून तिचा अमानुष छळ करण्यात आला होता. जादूटोण्याच्या नावाखाली कासव, मांडूळ, खवले मांजर यांची तस्करी होत असल्याचेही समोर आले आहे. मागील दोन वर्षांत कोट्यवधींच्या मांडूळ सापांची तस्करी करणाऱ्या 14 जणांच्या टोळीला पोलिसांनी जेरबंद केले होते.
डॉ. नरेंद्र दाभोलकर यांनी अंधश्रद्धा निर्मूलनासाठी आयुष्य वेचले. शासनाने त्यासाठी कायदा पारित केला. तरीही समाजात अनेक प्रकारच्या अंधश्रद्धा अजूनही कायम आहेत. एकीकडे विज्ञानाची कास धरणारे पुणे, तर दुसरीकडे अघोरी जादूटोण्याच्या गर्तेत अडकलेले पुणेकर, हे वास्तव. ही दुभंगलेली ओळख धोक्याची घंटा ठरत आहे.विशाल विमल, अंधश्रद्धा निर्मूलन समिती कायकर्ते