पुणे: कौटुंबिक वादातून स्वतःच्या मुलाच्या खुनासाठी 75 लाखांची सुपारी दिल्याच्या प्रकरणातील पिस्तूल पुरविणाऱ्याला गुन्हे शाखेच्या खंडणीविरोधी पथकाने अटक केली आहे. तब्बल दोन वर्षांपासून तो पोलिसांना गुंगारा देत होता. त्याच्यावर मोक्काअंतर्गत देखील कारवाई केली होती. नीलेश श्रीकांत गायकवाड (वय 24, रा. पिसोळी) असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे. याप्रकरणी शिवाजीनगर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल आहे.
16 एप्रिल 2024 रोजी दुपारी जंगली महाराज रोडवरील एका बांधकाम व्यावसायिकावर पिस्तुलातून गोळी झाडण्याचा प्रयत्न केला. मात्र, गोळी न सुटल्याने त्यांचा जीव वाचला होता. घटनेनंतर आरोपींनी ’तू आता वाचलास’ असे म्हणत तेथून पळ काढला. तपासादरम्यान कौटुंबिक वादातून वडिलांनीच मुलाच्या खुनासाठी दोघांना 75 लाख रुपयांची सुपारी दिल्याचे तपासात निष्पन्न झाले. यातील शूटरांना पिस्तूल पुरविणारा नीलेश गायकवाड हा घटनेनंतर फरार होता.
30 मार्च रोजी खंडणीविरोधी पथक काळेपडळ परिसरात गस्त घालत असताना गायकवाड हा आपल्या आईला भेटण्यासाठी पिसोळी येथे येणार असल्याची माहिती पोलिस हवालदार नितीन मुंढे यांना मिळाली. पोलिसांनी तत्काळ सापळा रचून त्याला ताब्यात घेतले. चौकशीत त्याने गुन्ह्यातील सहभागाची कबुली दिली. पोलिस उपायुक्त निखिल पिंगळे, सहायक पोलिस आयुक्त राजेंद्र मुळीक यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस निरीक्षक राम राजमाने, पोलिस उपनिरीक्षक गौरव देव, कर्मचारी नितीन मुंढे, कानिफनाथ कारखेले, दिलीप गोरे, साहिल शेख यांच्यासह पथकाने ही कारवाई केली.