येरवडा: शहरात गरिबाच्या ताटातील घास हिसकावणारी कारवाई करण्यात आली आहे. शास्त्रीनगर झोन क्र. १६ सह्याद्री हॉस्पिटलसमोर गेल्या १५ वर्षांपासून वैध परवान्याने व्यवसाय करणाऱ्या नोंदणीकृत पथारी व्यावसायिकांवर पुणे महापालिकेच्या अतिक्रमण विभागाकडून मध्यरात्री दहशतीत बुधवारी (दि. ५) रात्री एक वाजता कोणतीही नोटीस न देता वीज तोडून जेसीबीच्या साहाय्याने बंद टपऱ्या फोडण्यात आल्या.
कारवाईनंतर सर्वांना जबरदस्तीने जीएसटी भवन परिसरात हलविण्यात आले. मात्र, तिथे १०० हून अधिक स्टॉल असूनही एका नळाद्वारेही पाणीपुरवठा नाही, वीजपुरवठा नाही, स्वच्छतागृह नाही. या संपूर्ण प्रकारामागे उपआयुक्तांचा हात असल्याचा गंभीर आरोप व्यावसायिकांनी केला आहे.
त्यांनी बुधवारी आयुक्तांना निवेदन देत स्वतंत्र चौकशीची मागणी केली. व्यावसायिकांनी सहा मागण्या केल्या आहेत. त्यात बनकर यांच्या भूमिकेची चौकशी, दोन्ही कारवायांची उच्चस्तरीय चौकशी, मूळ जागेवर पुनर्स्थापना किंवा सुविधा असलेली पर्यायी जागा, आणि जीएसटी भवनमध्ये तत्काळ मूलभूत सुविधा देणे यांचा समावेश आहे. प्रशासनाने ४८ तासांत दखल न घेतल्यास महापालिका मुख्यालयासमोर धरणे आंदोलन आणि उपोषण करण्याचा इशारा दिला आहे.
अनधिकृत अतिक्रमण कारवाई रात्रीच्या वेळेत करण्यात येते. कष्टकऱ्यांवर हा अन्याय आहे. आम्ही याच्या विरोधात रस्त्यावर उतरणार आहे.बाबा कांबळे, राष्ट्रीय अध्यक्ष, नॅशनल फेरीवाला संघ
सर्व व्यावसायिक परवानाधारक आहेत. मागील १५ वर्षांपासून इथे व्यवसाय करतात. एका रात्रीत नोटीस न देताच कारवाई झाली, याचा आम्ही जाहीर निषेध करतो आणि जनआंदोलन उभारणार आहोत.अश्विनी लांडगे, नगरसेविका
वाहतुकीला अडथळा होऊ नये, यासाठी रात्रीच्या वेळी अतिक्रमण कारवाई करण्यात आली आहे.सोमनाथ बनकर, उपायुक्त, अतिक्रमण विभाग