वडगाव शेरी : वडगाव शेरीतील सोपाननगर लेन नं. ४ मध्ये घराबाहेर खेळणाऱ्या चार वर्षांच्या मुलीवर पाच ते सहा भटक्या कु्त्र्यांनी हल्ला केला होता. या हल्ल्यामध्ये मुलगी खाली पडल्यानंतर कुत्रे तिला ओढून घेऊन जात होते. रस्त्याच्या कडेने जाणाऱ्या दोन तरुणांनी मुलीला कुत्र्याच्या हल्ल्यातून सोडविले. सुदैवाने मुलीला गंभीर जखम झाली नाही. या प्रकारमुळे परिसरामध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. भटक्या कुत्र्यावर तातडीने कारवाई करण्याची मागणी नागरीक करत आहेत.
शहर व उपनगरामध्ये भटक्या कुत्र्यांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढली आहे. मोकळ्या जागेत कचऱ्यात व शिळे अन्न टाकले जातो. उघड्यावर टाकला जाणाऱ्या कचऱ्यामुळे कुत्र्यांना अन्न मिळते. यामुळे कुत्री कचराकुंडीच्या भोवती ठिय्या मारतात. भटकी कुत्रे पकडण्यासाठी पालिकेचे श्वान पथक आहे. मात्र, या श्वान पथकाला कुत्रे सापडत नाही . श्वान पथकांची गाडी पाहून कुत्रे पसार होतात. पालिकेच्या आरोग्य विभागाच्या आकडेवारीनुसार वर्षाला जवळपास दहा ते बारा हजार नागरिकांना कुत्री चावा घेतात.
वडगाव शेरी मध्ये काही वर्षापासून लहान मुलांवर कुत्र्यांनी हल्ला करण्याचे प्रकार वाढले आहे. काही वर्षापुर्वी वडगाव शेरीतील एका उच्चभ्रु सोसायटीतील भटक्या कुत्र्यांनी लहान मुलावर हल्ला केला होता. त्यानंतर नागरिकांनी भटक्या कुत्र्यांना सोसायटीच्या बाहेर काढले होता. यामुळे प्राणीप्रेमी आणि नागरिकांमध्ये वाद झाला होता. हा वाच सर्वोच्च न्यायलाय पर्यंत गेला आहे. तसेच, खराडीतील तुळजा भवानी नगर मध्ये भटक्या कुत्र्यांनी लहान मुलांवर हल्ला करण्याचा प्रकार घडला होता. कुत्र्यांनी मुलांवर हल्लाकेल्यानंतर पालिका कारवाई करते. पण, कालातंराने पुन्हा परिस्थिती कायम होते. नागरिकांवर हल्ले करणाऱ्या कुत्र्यावर कारवाई करण्याची मागणी नागरिक करत आहे.
गेल्या काही दिवसामध्ये कुत्री चावा घेण्याचे तसेच हिंसक होण्याचे प्रमाण वाढल्याचे नागरिक सांगतात. भटक्या कुत्र्याबाबत मोहल्ला कमिटी मध्ये तसेच पालिकेच्या ऑनलाईन पोर्टल वर नागरिक अनेकदा तक्रार करतात. पण, कुत्री पकडले जात नाही. पालिकेचे कर्मचारी कुत्री पकडण्यासाठी आल्यावर श्वानप्रेमी त्यांना पकडून देत नाही. त्यामुळे हिसंक कुत्र्यांवर कारवाई केली जात नाही.