Pune Municipal Corporation Pudhari
पुणे

Pune Standing Committee President: स्थायी समिती अध्यक्षपदासाठी चुरस; शिळीमकर, टिंगरे, भिमाले चर्चेत

भाजपकडे स्पष्ट बहुमत; जातीय व मतदारसंघीय समीकरणांवर निर्णय अवलंबून

पुढारी वृत्तसेवा

पुणे: महापौर व उपमहापौर उमेदवारनिश्चितीनंतर आता महापालिकेच्या स्थायी समिती अध्यक्षपदी कोणाची वर्णी लागणार, याबाबत उत्सुकता वाढली आहे. या पदासाठी आता इच्छुकांनी जोरदार फिल्डिंग लावली असून, ज्येष्ठ नगरसेवक राजेंद्र शिळीमकर, अनिल टिंगरे, श्रीनाथ भिमाले यांची नावे स्पर्धेत आहेत.

महापालिकेचे सर्व आर्थिक निर्णय स्थायी समितीच्या माध्यमातून होत असल्याने या समितीचे अध्यक्षपद अत्यंत महत्त्वाचे मानले जाते. महापौर आणि उपमहापौर निवडीनंतर स्थायी समितीसह अन्य समित्यांच्या अध्यक्षपदाच्या निवडणुका होणार आहेत. भाजपकडे स्पष्ट बहुमत असल्याने अध्यक्षपद भाजपकडेच राहणार असल्याचे स्पष्ट आहे. त्यानुसार भाजपमधील इच्छुकांनी स्थायीच्या अध्यक्षपदासाठी आत्तापासून फिल्डिंग लावण्यास सुरुवात केली आहे.

महापौरपदाच्या उमेदवार मंजूषा नागपुरे यांच्या रूपाने खडकवासला मतदारसंघाला, तर उपमहापौरपदाच्या उमेदवारीने शिवाजीनगर मतदारसंघाला प्रतिनिधित्व मिळाले आहे. तर, कसबा पेठ आणि पुणे कॅन्टोन्मेंट अशा दोन मतदारसंघांत विभागलेल्या प्रभागातून निवडून आलेल्या गणेश बिडकर यांना सभागृह नेतेपदाची संधी मिळाली आहे. त्यामुळे आता उर्वरित मतदारसंघांतील इच्छुकांना स्थायी समिती अध्यक्षपदाची संधी मिळेल, अशी शक्यता व्यक्त केली जात आहे. त्यामध्ये पर्वतीमधून राजेंद्र शिळीमकर व श्रीनाथ भिमाले, तर वडगाव शेरी मतदारसंघातून अनिल टिंगरे यांची नावे चर्चेत आहेत.

स्थायी समिती अध्यक्षपद निवडताना जातीय समीकरणे महत्त्वाची ठरणार आहेत. महापौर व सभागृहनेतेपद ओबीसी वर्गाकडे, तर उपमहापौरपद अनुसूचित जाती प्रवर्गाकडे गेले आहे. त्यामुळे आता स्थायी समितीसाठी मराठा चेहऱ्याला संधी दिली जाऊ शकते. त्यामुळे शिळीमकर व टिंगरे यांच्यातच अध्यक्षपदाची चुरस होण्याची शक्यता आहे.

...तर वडगाव शेरीला अधिक संधी

वडगाव शेरी मतदारसंघाचा पेपर भाजपसाठी नेहमीच अवघड गेला आहे. 2014 च्या विधानसभा निवडणुकीचा अपवाद वगळता या ठिकाणी भाजपला यश मिळालेले नाही. महापालिका निवडणुकीत भाजपला येथील मतदारांनी साथ दिली आहे. मात्र, पालिकेत या भागाला फारसे प्रतिनिधित्व मिळालेले नाही. त्यामुळे आगामी राजकीये गणिते लक्षात घेऊन भाजपकडून या भागाला प्रतिनिधित्व दिले जाऊ शकते. त्यामुळे तब्बल तीन टर्म निवडून आलेल्या अनिल टिंगरेंना स्थायी समिती अध्यक्षपदाची अधिक संधी आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT