Slum Pudhari
पुणे

Pune SRA TDR Scam: पुणे- पिंपरीत एसआरए टीडीआर घोटाळ्याचा पर्दाफाश

झोपडपट्टी पुनर्वसन योजनांमध्ये हजारो कोटींच्या अनियमिततेचे गंभीर आरोप; चौकशीची मागणी तीव्र

पुढारी वृत्तसेवा

पुणे: झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरण (एसआरए) कारभारावर गंभीर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहेत. या योजनांमध्ये गैरप्रकार करून हजारो कोटी रुपयांचे टीडीआर घोटाळे केले जात असल्याचे समोर आले आहे. प्रामुख्याने मागील तीन-चार वर्षांत एसआरएचे तत्कालीन मुख्य कार्यकारी अधिकारी नीलेश गटने यांच्या कार्यकाळातील अनेक योजनांमध्ये अनियमितता झाल्याच्या तक्रारी आल्या आहेत.

पुणे आणि पिंपरी-चिंचवड शहरातील झोपडीधारकांना हक्काची घरे देण्याच्या उद्देशाने राज्य शासनाने 2005 मध्ये एसआरए प्राधिकरणाची स्थापना केली. मात्र, गेल्या काही वर्षांत गोरगरीब झोपडपट्टीधारकांच्या नावाखाली काही बड्या बिल्डरांनी एसआरएला अक्षरश: ‌’टीडीआरची खाण‌’ करून लुटण्याचे काम केल्याचे उघड झाले आहे. दै. ‌’पुढारी‌’कडे यासंबंधीच्या अनेक तक्रारी आल्या असून, त्यांच्या चौकशीत अनेक धक्कादायक बाबी उघड झाल्या आहेत. प्रामुख्याने एसआरएचे सीईओ नीलेश गटने यांच्या कार्यकाळातच अनेक प्रकरणांमध्ये अनियमितता, मनमानी आणि बिल्डरधार्जिण्या निर्णयांमुळे अनेक योजना आता वादाच्या भोवऱ्यात आल्या आहेत.

यामध्ये प्रामुख्याने पिंपरी-चिंचवड महापालिका हद्दीतील योजनांचा समावेश आहे. त्यात मिलिंदनगर, विठ्ठलनगर, अजिंक्यनगर या बीएसयूपीतून नंतर एसआरएकडे आलेल्या योजनेतही मोठ्या प्रमाणात अनियमितता झाल्याचे आढळून आले आहे. तसेच, अजिंक्यनगर-निगडी, सॅनिटरी चाळ-पिंपरी, जाधववस्ती-रावेत, भोसरी एमआयडीसी प्लॉट आदी भागांत महापालिकेच्या आरक्षण क्षेत्रावर किंवा रिकाम्या जागांवर संगनमताने झोपड्या दाखवून योजना मंजूर केल्याच्या तक्रारी असून, या प्रक्रियेत कोट्यवधी रुपयांचा टीडीआर घोटाळा झाल्याचा गंभीर आरोप करण्यात आला आहे. याशिवाय पांडरकर चाळ-चिंचवड, कासारवाडी, जगताप चाळ-दापोडी यांसारख्या खासगी चाळींवरही झोपडपट्टी दाखवून योजना मंजूर करण्यात आल्याच्या तक्रारी दै. ‌’पुढारी‌’कडे आल्या असून, या सर्व प्रकरणांत मोठ्या प्रमाणावर टीडीआर वितरित करण्यात आल्याचा दावा करण्यात आला आहे.

जनता वसाहत झोपडपट्टीची पुनरावृत्ती

पुण्यातील जनता वसाहतीमध्ये एसआरए योजना राबविण्याच्या नावाखाली एसआरएचे सीईओ नीलेश गटने याने चुकीचा सर्व्हे नंबर दाखवून बिल्डरला 786 कोटींचा टीडीआर देण्याचा प्रस्ताव मंजूर केला होता. मात्र, दै. ‌’पुढारी‌’ने हा दरोडा उघडकीस आणत तो हाणून पाडला होता. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दै. ‌‘पुढारी‌’च्या वृत्तमालिकेची दखल घेऊन जनता वसाहत टीडीआरला स्थगिती देऊन चौकशीचे आदेश दिले आहेत. जनता वसाहत हे तर हिमनगाचे टोक ठरेल, अशा पद्धतीचे एसआरएतील गैरव्यवहार आता चव्हाट्यावर आले आहेत.

दै. ‌‘पुढारी‌’ करणार एसआरए घोटाळ्यांचा पर्दाफाश

पुणे आणि पिंपरी-चिंचवड शहरात राबविण्यात आलेल्या 15 ते 20 योजनांमध्ये गैरव्यवहार करून कोट्यवधींचा टीडीआर लाटण्यात आला आहे. एसआरएचे वरिष्ठ अधिकारी आणि बिल्डर्स यांच्या संगनमताने हे घोटाळे करण्यात आले असून, त्यासंबंधीचे अनेक पुरावे दै. ‌’पुढारी‌’ने मिळविले आहेत. त्यामुळे गोरगरीब झोपडपट्टीधारकांच्या पुनर्वसन योजनांच्या नावाखाली करण्यात आलेल्या एसआरए योजनांमधील घोटाळ्यांचा दै. ‌’पुढारी‌’ वृत्तमालिकेच्या माध्यमातून पर्दाफाश करणार आहे.

झोपडपट्टी पुनर्वसनाच्या ज्या योजनांमध्ये गैरव्यवहार अथवा अनियमितता झाल्याच्या तक्रारी आल्या आहेत. त्या सर्व योजनांची चौकशी केली जाईल. त्यात तथ्य आढळल्यास संबंधितांवर कडक कारवाई करण्यात येईल.
सतीशकुमार खडके, मुख्य कार्यकारी अधिकारी, एसआरए

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT