पुणे: ‘फिट पुणे, फिट इंडिया’ या संकल्पनेला गती देत पुणे महानगरपालिकेच्या 2026-27 च्या अंदाजपत्रकात क्रीडा क्षेत्रासाठी व्यापक आणि दूरदृष्टीपूर्ण उपक्रमांची घोषणा केली आहे. क्रीडा नर्सरीपासून अत्याधुनिक हायपोक्सिक प्रशिक्षण सुविधांपर्यंत विविध स्तरांवर खेळाडू घडविण्याचा आराखडा यामध्ये मांडण्यात आला आहे.
स्थायी समिती अध्यक्ष श्रीनाथ भिमाले यांनी क्रीडा क्षेत्रासाठी मोठी आर्थिक तरतूद करीत शहरात क्रीडासंस्कृतीला चालना देण्यावर विशेष भर दिला आहे. बालवयातच क्रीडाकौशल्य विकसित व्हावे, यासाठी हडपसरसह शहरातील विविध भागांमध्ये क्रीडा नर्सरी सुरू करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. या उपक्रमामुळे भविष्यातील गुणवंत खेळाडू घडण्यास मदत होणार आहे.
पुणे महानगरपालिकेच्या पं. जवाहरलाल नेहरू स्टेडियमचा सर्वांगीण विकास करून तेथे आंतर राष्ट्रीय दर्जाच्या सुविधा उपलब्ध करून दिल्या जाणार आहेत. यामध्ये आधुनिक क्रीडा साहित्य, प्रगत प्रशिक्षण सुविधा आणि सरावासाठी आवश्यक पायाभूत व्यवस्था उभारण्यात येणार आहे. याचा विशेष लाभ शहराच्या मध्यवर्ती भागातील खेळाडूंना होईल.
याचबरोबर गणेश कला क्रीडा रंगमंचाचेही आधुनिकीकरण करण्यात येणार आहे. शहरातील विविध परिसरांमध्ये सुसज्ज आणि अद्ययावत क्रीडांगणे उभारून युवकांना दर्जेदार सुविधा उपलब्ध करून देण्यावर भर देण्यात आला आहे. यामुळे क्रीडा क्षेत्रात सहभाग वाढण्यासोबतच नागरिकांमध्ये आरोग्यदायी जीवन शैलीची जाणीव निर्माण होणार आहे.
सुविधा उपलब्ध करून देणार
ॲथलेटिक्स, मॅरेथॉन, सायकलिंग आणि पर्वतारोहण यांसारख्या क्रीडाप्रकारांसाठी हायपोक्सिक प्रशिक्षण केंद्र उभारण्यात येणार असून, येथे वैज्ञानिक पद्धतीने प्रशिक्षण, तज्ज्ञ मार्गदर्शन, फिटनेस मोजमाप आणि कामगिरी विश्लेषणाची सुविधा उपलब्ध करून दिली जाणार आहे. महापालिकेच्या क्रीडा धोरणाची प्रभावी अंमलबजावणी करीत शहराच्या वाढत्या विस्ताराचा विचार करून विविध भागांत क्रीडांगणे, बहुउद्देशीय क्रीडासंकुले, बॅडमिंटन कोर्ट, व्यायामशाळा, जलतरण तलाव आणि ओपन जिम उभारण्याचा आराखडा तयार करण्यात आला आहे.