पुणे: विमान प्रवाशांची गर्दी आता रेल्वेस्थानकावर दिसायला सुरुवात झाली आहे. त्यामुळे मध्य रेल्वेकडून 18 विशेष गाड्या सोडण्याचे नियोजन केले असल्याचे दिसत आहे. यातील 4 विशेष गाड्या पुण्यातून पुणे आणि हडपसर रेल्वे स्थानकांमधून धावणार आहेत. या विशेष गाड्यांमुळे प्रवाशांना मोठा दिलासा मिळत असल्याचे चित्र आहे.
इंडिगोला उद्भवलेल्या समस्येमुळे अनेक विमाने रद्द होत आहेत. त्यामुळे विमान प्रवासी आता पुढील प्रवासासाठी रेल्वेकडे पर्याय म्हणून पहात आहेत. त्यामुळे रेल्वेकडूनही प्रवाशांच्या सोयीसाठी विशेष गाड्या चालवण्याचे नियोजन केल्याचे दिसत आहे. दि. 6 ते 12 डिसेंबर 2025 दरम्यान मध्य रेल्वेने एकूण 18 विशेष गाड्या चालवण्याचे जाहीर केले आहे. यातील काही गाड्या गेली दोन दिवसांत धावल्या आहेत, तर उर्वरित गाड्या पुढील 12 तारखेपर्यंत धावणार आहेत.
डीजीसीएने आदेश मागे घेतल्यामुळे उद्भवलेली परिस्थिती हळूहळू पूर्वपदावर येत असली, तरीदेखील पुणे विमानतळावरून पाचव्या दिवशी म्हणजेच रविवारी (दि. 07) इंडिगोची 13 विमाने रद्द करण्यात आली. यामुळे प्रवाशांना मोठा मनस्ताप सहन करावा लागला.
इंडिगो एअर लाईन्सकडे पायलटची मोठी कमतरता झाल्यामुळे देशासह राज्यातील सर्वच विमानतळांवर विमानांची मोठी कोंडी निर्माण झाली. पुणे विमानतळावर देखील अशीच स्थिती मागील पाच दिवसांपासून पाहायला मिळत आहे. मात्र, आता डीजीसीएने आदेश मागे घेतल्यावर पूर्वीपेक्षा आता ही स्थिती कमी होताना दिसत आहे. दरम्यान, रविवारी या गोंधळाचा पाचवा दिवस होता. याही दिवशी तब्बल 13 विमाने रद्द झाल्याची माहिती पुणे विमानतळ प्रशासनाने दिली.
रेल्वे स्थानकांवर प्रवाशांची गर्दी वाढलेली आहे, हे लक्षात घेत मध्य रेल्वेकडून एकूण 18 विशेष गाड्या सोडण्याचे नियोजन करण्यात आले आहे. यातील चार विशेष गाड्या पुणे आणि हडपसर रेल्वे स्थानकावरून सुटणार आहेत. या विशेष गाड्यांमुळे रेल्वे स्थानकावरील वाढलेली गर्दी कमी होईल.हेमंत कुमार बेहरा, विभागीय वाणिज्य व्यवस्थापक तथा जनसंपर्क अधिकारी, मध्य रेल्वे, पुणे विभाग