पुणे: जुन्या वाड्यांचा पुनर्विकास हा प्रश्न सोडविण्यासाठी 2021 पूर्वी पुणे महापालिकेच्या आणि राज्य शासनाच्या समन्वयातून झालेल्या निर्णयाचा आधार घेत सोमवार पेठेतील चार वाड्यांचा पुनर्विकास करून देण्याच्या गणेश बिडकर यांच्या प्रयत्नांना यश आले आहे. या वाड्यांतील जुन्या 50 भाडेकरूंना एक रुपयाही खर्च न करता फ्लॅट मिळाले असल्याने भाडेकरू-घरमालक वादही संपुष्टात आला.
जुन्या पुण्यातील पेठांमध्ये वाड्यांचे प्रश्न, मालकी हक्कांचे वाद, जुने भाडेकरू आणि घरमालक वाद, अशी आव्हाने आहेत. 214 ते 216 तसेच 249 या सोमवार पेठेतील सर्व्हे क्रमांकांवर अतिशय जुने, पावसाळ्यात कधीही पडू शकतील असे वाडे होते. त्यामुळे रहिवासी चिंतेत असत. अशा परिस्थितीत भारतीय जनता पक्षाचे महापालिकेतील तत्कालीन सभागृह नेते गणेश बिडकर यांनी पुढाकार घेऊन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे पाठपुरावा करत एक योजना सुरू केली. जेवढी भाडेकरूची जागा असेल त्यापेक्षा निम्मी जागा विकसकाला देणारी आणि भाडेकरूंना कसलाही खर्च होऊ न देता नवा कोरा फ्लॅट देणारी ही महापालिकेची योजना होती.
योजनेचा लाभ घेणाऱ्या मंगल जैद यांनी दिलेल्या माहितीनुसार, त्यांच्या वाड्यातील 24 भाडेकरू कायम भीतीच्या सावटाखाली राहत होते. पावसाळ्यात वाडा कधीही कोसळेल अशी भीती होती. गणेश बिडकर यांच्यामुळे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी लक्ष घातले. त्यामुळे आता हक्काचे स्वतःचे घर झाले.
घरमालक-भाडेकरू वाद सुध्दा संपला. याचे श्रेय गणेश बिडकर यांना आहे, सोमवार पेठेतील रहिवासी उद्धव मराठे म्हणाले, येथील एका वाड्याचे पुनर्वसन 2021 मध्ये सुरू झाले. ते दीड वर्षात पूर्ण झाले. इतर तीन वाड्यांचे काम 2022 अखेरीस सुरू झाले. आता लोक तेथे राहण्यासाठीही आले आहेत. एकूण 50 जुन्या भाडेकरूंना विनामूल्य, हक्काची घरे मिळाली याचे आम्हाला समाधान आहे.
शहराच्या मध्यभागातील पेठांमध्ये जुन्या वाड्यांचे प्रश्न मार्गी लावण्यासाठी गेल्या कार्यकाळात मी कायम आग््राही राहिलो होते. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी सातत्याने पाठपुरावा करून योजना मंजूर करून घेतली. त्याचा फायदा माझ्या प्रभागासह इतर पेठांतील नागरिकांना झाला. दरम्यान, पाच वर्षे सुरू असलेली ही योजना मध्यंतरी बंद झाली. ती पुन्हा सुरू करण्याचा माझा प्रयत्न राहील.गणेश बिडकर, माजी सभागृह नेते, पुणे महापालिका