पुणे : भारतीय अर्थव्यवस्थेत माहिती तंत्रज्ञान (आयटी) आणि सॉफ्टवेअर निर्यात हे क्षेत्र एका भक्कम स्तंभासारखे उभे आहे. गेल्या काही दशकांत भारताने जागतिक स्तरावर ‘सॉफ्टवेअर हब’ म्हणून स्वतःची ओळख निर्माण केली आहे. यात पुणे शहर देखील मोठे हब ठरू शकते. हे क्षेत्र केवळ परकीय चलन मिळवून देणारे साधन नसून, देशातील लाखो तरुणांना रोजगार देणारे आणि तांत्रिक क्रांती घडविणारे प्रमुख इंजिन आहे.
पायाभूत सुविधांच्या बाबतीत टियर-2 ते 4 शहरांमधील दरी आहे. आयटी उद्योग छोट्या शहरात नेला जाईल, असे मागच्या बजेटमध्ये जाहीर केले होते. प्रत्यक्षात तिथे हायस्पीड इंटरनेट आणि अखंड वीजपुरवठा यामध्ये अजूनही सातत्य नाही. ‘स्किल इंडिया’अंतर्गत अनेक प्रशिक्षण केंद्र सुरू झाली; पण एआय, मशिन लर्निंग आणि सायबर सिक्युरिटीत ज्या दर्जाचे मनुष्यबळ हवे आहे, ते मिळत नाही. सॉफ्टवेअर निर्यात सेवांवर शून्य कर असला तरी, जीएसटी परतावा मिळवण्याची प्रक्रिया अजूनही क्लिष्ट आहे. मध्यम आणि लहान स्टार्टअप्ससाठी ही ‘कॅश फ्लो’ची समस्या बनते. ही प्रक्रिया पूर्णपणे स्वयंचलित होणे अपेक्षित आहे.
भारत ‘सर्व्हिस’मध्ये उत्तम आहे, पण स्वतःचे ‘सॉफ्टवेअर प्रॉडक्ट्स’ बनवण्यात आपण मागे आहोत. जागतिक स्पर्धेसाठी संशोधनावर आधारित कामांना विशेष आर्थिक प्रोत्साहन मिळणे गरजेचे आहे, ज्याची घोषणा अनेकदा होते; पण निधी वाटप संथ असते. बदलत्या जागतिक परिस्थितीनुसार, भारताकडे केवळ ‘सेवा पुरवठादार’ न राहता ‘उत्पादन निर्माते’ बनण्याची मोठी संधी आहे. सरकारी धोरणे आणि उद्योजकांचा उत्साह यांचा मेळ बसल्यास आपण सॉफ्टवेअर निर्यातीचे उद्दिष्ट सहज गाठू शकतो. येणाऱ्या काळात अंमलबजावणीतील त्रुटी दूर करून सूक्ष्म, लघु आणि मध्यम सॉफ्टवेअर कंपन्यांना बळ दिल्यास हे क्षेत्र भारताला 5 ट्रिलियन डॉलरच्या अर्थव्यवस्थेकडे नेण्यात मोलाचा वाटा उचलेल.
डिजिटल इंडिया, स्टार्टअप इंडिया आणि स्किल इंडिया यांसारख्या मोहिमांमुळे सॉफ्टवेअर निर्यातीला एक नवी दिशा मिळाली आहे.
पायाभूत सुविधांचा विकास आणि टियर-2, टियर-3 शहरांमध्ये विस्तारत असलेले तंत्रज्ञानाचे जाळे हे भविष्यातील उज्ज्वल वाटचालीचे संकेत आहेत.