Pune Rapido Viral Story Pudhari
पुणे

Pune Rapido Viral Story: १२ लाखांचं पॅकेज असूनही पुण्यातील इंजिनिअर चालवतोय रॅपिडो; कारण ऐकून तुम्हीही व्हाल थक्क

Pune Software Engineers Drive Rapido on Weekends: पुण्यातील दोन सॉफ्टवेअर इंजिनिअर्सना वर्षाला सुमारे १२ लाख रुपयांचे पॅकेज असल्याचा दावा करणारी पोस्ट सोशल मीडियावर व्हायरल झाली आहे.

Rahul Shelke

Pune Software Engineers Drive Rapido on Weekends: आठवडाभर ऑफिसमध्ये काम केल्यानंतर बहुतेक जण वीकेंडला आराम करण्याचा किंवा मित्रांसोबत फिरायला जाण्याचा विचार करतात. मात्र, पुण्यातील दोन सॉफ्टवेअर इंजिनिअर्सनी वीकेंड घालवण्याची एक वेगळीच पद्धत निवडली आहे. चांगली नोकरी आणि वर्षाला लाखोंचे पॅकेज असतानाही हे दोघे तरुण आपल्या स्पोर्ट्स बाईकवरून रॅपिडो चालवण्यासाठी बाहेर पडतात. त्यांच्या या वेगळ्या प्रयोगाची सध्या सोशल मीडियावर जोरदार चर्चा सुरू आहे.

वर्षाला १२ लाखांचं पॅकेज, तरीही रॅपिडो चालवतात

सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या एका पोस्टनुसार, पुण्यातील एका टेक क्षेत्रातील तरुणाने आपल्या दोन रूममेट्सची ही गोष्ट शेअर केली आहे. हे दोघेही एका चांगल्या कंपनीत सॉफ्टवेअर इंजिनिअर म्हणून काम करतात. त्यांचे वार्षिक पॅकेज प्रत्येकी सुमारे १२ लाख रुपये असल्याचे पोस्टमध्ये सांगण्यात आले आहे. म्हणजेच महिन्याला जवळपास एक लाख रुपयांचे पॅकेज.

Pune Rapido Viral Story

चांगली नोकरी, भरघोस पगार आणि स्वतःची स्पोर्ट्स बाईक असतानाही या दोघांनी वीकेंडला काहीतरी वेगळे करून पाहण्याचे ठरवले. त्यासाठी त्यांनी आपल्या बाईक रॅपिडो या बाइक टॅक्सी सेवेसाठी नोंदवून वीकेंडला प्रवाशांना सेवा देण्यास सुरुवात केली.

सहसा वीकेंडला आराम करणारे किंवा फिरायला जाणारे तरुण पाहायला मिळतात. मात्र, या दोघांनी वीकेंडला बाइक टॅक्सी चालवण्याचा पर्याय घेतल्याने अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत.

दिवसभर राइड केल्या, किती कमाई झाली?

या दोघांनी दिवसभर रॅपिडोच्या माध्यमातून प्रवाशांना सेवा दिली. त्यानंतर दिवसाच्या कमाईचा हिशोब केला असता, त्यांना मिळालेली रक्कम चर्चेचा विषय ठरली.

व्हायरल पोस्टनुसार, एका इंजिनिअरने दिवसभरात ९२९ रुपयांपेक्षा अधिक कमाई केली, तर दुसऱ्या इंजिनिअरने सुमारे ५०० रुपये कमावले. त्यांच्या नियमित पगाराच्या तुलनेत ही रक्कम फार मोठी नसली, तरी त्यांच्या या प्रयोगामागील उद्देश काय असावा, याबद्दल सोशल मीडियावर वेगवेगळे अंदाज व्यक्त केले जात आहेत.

मात्र, या तरुणांनी केवळ पैसे कमावण्यासाठीच हा निर्णय घेतला की नवीन अनुभव घेण्यासाठी रॅपिडो चालवण्यास सुरुवात केली, याबाबत पोस्टमध्ये स्पष्ट माहिती देण्यात आलेली नाही.

सोशल मीडियावर नेटकऱ्यांच्या वेगवेगळ्या प्रतिक्रिया

ही पोस्ट व्हायरल होताच नेटकऱ्यांनी त्यावर मजेशीर प्रतिक्रिया देण्यास सुरुवात केली. काहींनी तरुणांच्या या कृतीचे कौतुक केले, तर काहींनी त्यामागील कारणांवर चर्चा केली.

एका युजरने मुलं आपल्या आवडीसाठी काहीही करू शकतात, अशी प्रतिक्रिया दिली. तर दुसऱ्या युजरने कॉर्पोरेट क्षेत्रातील कामाचा ताण कमी करण्यासाठी आणि नवीन लोकांना भेटण्यासाठी हा एक चांगला मार्ग असू शकतो, असे म्हटले.

खरं तर, चांगली नोकरी आणि मोठा पगार असूनही एखादी व्यक्ती वेगळा अनुभव घेण्यासाठी काय करू शकते, याचे हे उदाहरण असल्याचे अनेकांचे म्हणणे आहे. अर्थात, या तरुणांचा नेमका हेतू काय होता, हे स्पष्ट झालेले नाही.

पैशांपेक्षा अनुभव महत्त्वाचा की वीकेंडचा नवा छंद?

आजच्या काळात अनेक तरुण चांगल्या पगाराची नोकरी मिळवण्यासाठी मेहनत घेतात. मात्र, नोकरी मिळाल्यानंतरही काही जणांना रोजच्या ठरलेल्या दिनक्रमापेक्षा काहीतरी वेगळे करून पाहण्याची इच्छा असते. पुण्यातील या दोन इंजिनिअर्सची गोष्टही याच कारणामुळे चर्चेत आहे.

त्यांच्यासाठी रॅपिडो चालवणे हा अतिरिक्त कमाईचा मार्ग आहे, नवीन लोकांना भेटण्याचा अनुभव आहे की केवळ वीकेंडचा छंद, हे अद्याप स्पष्ट नाही. पण लाखोंचे पॅकेज असतानाही त्यांनी निवडलेला हा वेगळा मार्ग अनेकांचे लक्ष वेधून घेत आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT