Cyber Fraud Pudhari
पुणे

Pune Cyber Blackmail Case: पुण्यात सायबर ब्लॅकमेलिंगमुळे तरुण इंजिनिअरने जीवन संपविले; बिहारमधून दोघांना अटक

मुलगी बनून सोशल मीडियावर मैत्री, अश्लील व्हिडीओ व्हायरल करण्याची धमकी देत १.७७ लाख उकळले; पंजाब, अरुणाचल प्रदेशातील आरोपींचाही शोध सुरू

पुढारी वृत्तसेवा

पुणे: खराडी येथील २२ वर्षीय सॉफ्टवेअर इंजिनिअरला ऑनलाइन ब्लॅकमेल करून आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी पुणे पोलिसांनी बिहारमधील दोघांना अटक केली आहे. मुलगी बनून सोशल मीडियावर मैत्री करायची आणि नंतर पोलिस अधिकारी असल्याचे भासवून ड्रग्जच्या खोट्या गुन्ह्यात अडकवण्याची धमकी द्यायची, अशा पद्धतीने आरोपी ब्लॅकमेलिंग करीत होते.

शिखर गौरव सक्सेना याच्याकडून त्यांनी पाच बँक खात्यांतून १ लाख ७७ हजार रुपये उकळले. सततच्या धमक्या आणि मानसिक छळाला कंटाळून अखेर शिखरने दि. १ ऑक्टोबर रोजी इमारतीच्या २७ व्या मजल्यावरून उडी मारून आत्महत्या केली होती. याप्रकरणी खराडी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. आकाशकुमार संजय सिंह (वय १८) आणि राजकुमार संपूर्णानंद सिंह (वय २२, दोघे रा. बिहार), अशी अटक केलेल्या आरोपींची नावे आहेत.

पोलिस तपासानुसार, आरोपींनी इन्स्टाग्रामवर मुलींच्या नावाने बनावट खाती तयार केली होती. त्याद्वारे शिखरशी संपर्क साधून त्याला टेलिग्रामवर बोलावले. व्हिडीओ कॉलदरम्यान अश्लील व्हिडीओ दाखवून त्याचे रेकॉर्डिंग करण्यात आले. त्यानंतर व्हिडीओ व्हायरल करण्याची तसेच ड्रग्जच्या खोट्या गुन्ह्यात अडकविण्याची धमकी देऊन पैसे उकळले. पोलिस अधिकारी असल्याचे भासवूनही त्याला घाबरविण्यात आले.

बिहारमध्ये सापळा रचून अटक

शिखरचे वडील कुमार गौरव सक्सेना यांच्या तक्रारीवरून खराडी पोलिसांनी दि. १४ ऑक्टोबर रोजी आत्महत्येस प्रवृत्त करणे, खंडणी आणि धमकी दिल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला. तांत्रिक तपासातून आरोपींचे ठिकाण समजल्यानंतर पोलिस पथक बिहारला रवाना झाले. चार दिवसांच्या शोधानंतर दि. २० ऑक्टोबर रोजी पाटण्यात दोघांना पकडण्यात आले. त्यांच्याकडून सात मोबाईल, लॅपटॉप आणि टॅबसह २ लाख २२ हजार रुपयांचे इलेक्ट्रॉनिक साहित्य जप्त करण्यात आले. न्यायालयाने दोघांना दि. ३० ऑक्टोबरपर्यंत पोलिस कोठडी सुनावली आहे. ही कामगिरी पोलिस आयुक्त अमितेश कुमार, पोलिस उपायुक्त अबिनाश कुमार, गुन्हे उपनिरीक्षक गौहर हसन यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलिस निरीक्षक संजय चव्हाण, चंद्रसेन पालकर यांच्या पथकाने केली.

पंजाब, अरुणाचलपर्यंत धागेदोरे

या प्रकरणात पंजाबमधील अनिकेत गुप्ता आणि अरुणाचल प्रदेशातील कृष कुमार यांची नावे समोर आली असून, पोलिस त्यांचा शोध घेत आहेत. नागरिकांनी अनोळखी व्यक्तींच्या व्हिडीओ कॉलला किंवा धमक्यांना घाबरून पैसे पाठवू नयेत. सायबर फसवणूक झाल्यास १९३० या हेल्पलाइनवर संपर्क साधावा, असे आवाहन पोलिसांनी केले आहे.

मनीलाॅन्ड्रिंगच्या धाकाने फसवणूक

मनीलॉन्ड्रिंगचा धाक दाखवून अटक करण्याच्या बहाण्याने सायबर ठगांनी उत्तमनगरमधील ५६ वर्षीय व्यक्तीची दोन लाख रुपयांची फसवणूक केली. याप्रकरणी उत्तमनगर पोलिसांनी सायबर चोरट्यांच्या विरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. आरोपींनी फिर्यादींना व्हॉटस्‌ॲपद्वारे कॉल करून मनीलॉन्ड्रिंगचा धाक दाखविला तसेच त्याला अटक करण्याची भीती दाखवली. फिर्यादीला दोन लाख रुपये आपल्या खात्यावर भरण्यास सांगितले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT