Pune Smart Meter Pudhari
पुणे

Pune Smart Meter: स्मार्ट मीटरवरून गैरसमजाचा धुराळा; ग्राहक संघटनांचा विरोध कायम

या सर्व आरोपांमध्ये तथ्य नसल्याचा दावा महावितरणने केला आहे.

पुढारी वृत्तसेवा

पुणे: पुणे शहर आणि परिसरात महावितरणकडून मोठ्या प्रमाणावर स्मार्ट मीटर बसविण्याचे काम सुरू असताना या मीटरबाबत अनेक गैरसमज आणि अफवा पसरत आहेत. स्मार्ट मीटर बसवल्यानंतर वीजबिले वाढतात, मीटर प्रीपेड असल्यामुळे आधी रिचार्ज करावा लागतो, मीटर वेगाने धावतात, अशा प्रकारच्या शंका अनेक ग्राहकांकडून व्यक्त केल्या जात आहेत.

या सर्व आरोपांमध्ये तथ्य नसल्याचा दावा महावितरणने केला आहे. दुसरीकडे, ग्राहक संघटनांनी स्मार्ट मीटरच्या अंमलबजावणीवर प्रश्नचिन्ह उपस्थित करत विरोध कायम ठेवला आहे. महावितरणच्या म्हणण्यानुसार, स्मार्ट मीटर हे पूर्णपणे पोस्टपेड स्वरूपाचे असून ग्राहकांना पूर्वीप्रमाणेच वीज वापरल्यानंतर बिल दिले जाणार आहे.

त्यामुळे ग्राहकांना आधी रिचार्ज करण्याची कोणतीही आवश्यकता नाही. मीटरमधून मिळालेल्या रीडिंगच्या आधारे छापील वीजबिल तयार करून ते ग्राहकांना दिले जाईल. तसेच, वीजबिल भरण्यासाठी सध्या मिळणारी २१ दिवसांची मुदत यापुढेही कायम राहणार आहे.

दरम्यान रीडिंगमधील मानवी चुका होणार बंद होणार असून, स्मार्ट मीटरमुळे वीजमीटरचे रीडिंग थेट सर्व्हरवर पाठविले जाते. त्यामुळे मीटर रीडिंग घेण्यासाठी कर्मचार्‍यांना प्रत्यक्ष घरी जाण्याची गरज राहत नाही.

यामुळे रीडिंग घेताना होणार्‍या मानवी चुका टाळल्या जातात. ज्या दिवशी संबंधित ग्राहकाची मीटर रीडिंगची नियोजित तारीख असते, त्याच दिवशी स्मार्ट मीटर आपोआप रीडिंग सर्व्हरवर पाठवते. त्यामुळे रीडिंगच्या तारखेत बदल होत नाही आणि ग्राहकांना वेळेत व अचूक वीजबिल मिळण्यास मदत होते. प्रीपेड नव्हे, पोस्टपेड मीटर स्मार्ट मीटरबाबत सर्वाधिक गैरसमज हा ते प्रीपेड असल्याचा आहे.

अनेक ग्राहकांना या मीटरमध्ये मोबाईलप्रमाणे आधी रिचार्ज करावा लागेल, अशी भीती वाटत आहे. मात्र, महावितरणने हा दावा फेटाळून लावत हे मीटर पोस्टपेडच असल्याचे स्पष्ट केले आहे. ग्राहकांनी जितकी वीज वापरली, त्यानुसारच त्यांचे बिल तयार होणार असून त्यामध्ये कोणताही बदल होणार नसल्याचे सांगण्यात आले आहे.

स्मार्ट मीटर बसवितात ठेकेदार कंपनीचे कर्मचारी स्मार्ट मीटर बसविण्याचे काम महावितरणचे कर्मचारी करत नसून त्यासाठी नियुक्त करण्यात आलेल्या ठेकेदार कंपनीमार्फत हे काम सुरू आहे. महावितरणने स्मार्ट मीटर बसविण्याचा ठेका अदानी कंपनीला दिला असून या कंपनीचे प्रतिनिधी आणि कर्मचारी सोसायट्या तसेच घराघरांत जाऊन मीटर बसवित आहेत.

त्यामुळे मीटर बसविण्यासाठी येणारे कर्मचारी महावितरणचे कर्मचारी नसल्याची माहितीही ग्राहकांनी लक्षात घ्यावी, असे महावितरणने स्पष्ट केले आहे.टी.ओ.डी. मीटरधारकांना प्रतियुनिट 85 पैशांची सवलत महावितरणला सध्या सौरऊर्जा प्रकल्पांतून तुलनेने कमी दरात वीज उपलब्ध होत आहे.

या स्वस्त वीजेचा लाभ ग्राहकांपर्यंत पोहोचविण्यासाठी टाइम ऑफ डे (टी.ओ.डी.) सुविधेची आवश्यकता असल्याचे महावितरणचे म्हणणे आहे. टी.ओ.डी. सुविधा असलेल्या स्मार्ट मीटरधारक ग्राहकांना सकाळी 9 ते सायंकाळी 5 या कालावधीत वापरलेल्या विजेवर प्रति युनिट 85 पैशांची सवलत दिली जाते.

त्यामुळे दिवसा वीज वापरणार्‍या ग्राहकांना थेट आर्थिक लाभ मिळू शकतो. 'मीटर जास्त धावतात' हा आरोपही फेटाळला स्मार्ट मीटर बसवल्यानंतर वीज वापरापेक्षा जास्त युनिट नोंदविले जात असल्याचा आरोप काही ग्राहकांकडून केला जात आहे. मात्र, महावितरणने हा आरोपही फेटाळून लावत स्मार्ट मीटर ग्राहकाने प्रत्यक्ष वापरलेल्या विजेचीच अचूक नोंद करतात, असे स्पष्ट केले आहे.

त्यामुळे जास्त बिल येत असल्यास त्यामागे वाढलेला वापर किंवा इतर कारणे असू शकतात, असा दावा महावितरणकडून करण्यात आला आहे.तक्रारींचा तपास व्हावा दरम्यान, स्मार्ट मीटरच्या अंमलबजावणीवर ग्राहक संघटनांनी आक्षेप कायम ठेवला आहे. वीजबिलात वाढ होत असल्याच्या तक्रारींचा तपास व्हावा, तसेच जुने मीटर कार्यरत असताना नवीन मीटर बसविण्याची गरज काय, असा सवालही संघटनांनी उपस्थित केला आहे.

स्मार्ट मीटर बसवल्यानंतर वीजबिल जास्त येते, अशा अनेक तक्रारींची चर्चा सुरू आहे. आम्ही ग्राहकांना अधिकृतपणे आमच्याकडे तक्रारी नोंदविण्याचे आवाहन केले आहे. मात्र, आजपर्यंत एकाही ग्राहकाने लेखी तक्रार आमच्याकडे दिलेली नाही. त्यामुळे महावितरणविरोधातील अनेक आरोप केवळ चर्चेपुरतेच राहिले आहेत.
- विवेक वेलणकर, अध्यक्ष, सजग नागरिक मंच
जुने मीटर व्यवस्थित सुरू असताना नवीन स्मार्ट मीटर बसविण्याची आवश्यकता काय, हा मूलभूत प्रश्न आहे. महावितरणचे टप्प्याटप्प्याने खासगीकरण करण्याचा हा प्रयत्न असून स्मार्ट मीटरच्या माध्यमातून ग्राहकांची आर्थिक लूट करण्याचा नवीन प्रकार सुरू करण्यात आला आहे.
- संजय कवडे, माजी अध्यक्ष, पुणे जिल्हा वीजग्राहक संघटना

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT