पुणे: महापालिकेत समाविष्ट गावांची संख्या जास्त असलेल्या प्रभाग क्र. 33, 34 आणि 35 या परिसरातील मतमोजणी प्रक्रिया गुरुवारी सायंकाळी 5.30 वाजता पूर्ण झाली. भाजपला दोन प्रभागात एकहाती तर एका प्रभागात संमिश्र यश मिळाले आहे.
प्रभाग क्र. 33 मध्ये 'अ' आणि 'क' गटांमध्ये भाजपाचे, तर 'ब' आणि 'ड' गटांमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचे (शरद पवार गट) उमेदवार विजयी झाले. तर प्रभाग क्र. 34 आणि 35 मधील सर्वच गटांमध्ये भाजपच्या उमेदवारांनी एकहाती गड राखला. सिंहगड रस्ता क्षेत्रीय कार्यालयातील मतमोजणी शहरात सर्वाधिक जलद पध्दतीने पूर्ण झाली. सिंहगड रस्ता क्षेत्रीय कार्यालयात सरासरी 54.49 टक्के मतदान झाले होते. शुक्रवारी सकाळी 10.15 वाजता मतमोजणीला सुरुवात झाली. प्रारंभी टपाली मते मोजली. त्यानंतर ईव्हीएममधील मतांची मोजणी सुरू केली. सकाळी 11.30 वाजता प्रभाग क्र. 33 मधील पहिल्या फेरीचे निकाल हाती आले. त्यानंतर मतमोजणीची पुढील प्रक्रिया वेगाने पार पडली. निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून मनोजकुमार खैरनार यांनी काम पाहिले.
सर्वच उमेदवारांचे प्रतिनिधी सकाळी 9.30 वाजतापासून शरदचंद्र पवार ई-लर्निंग स्कूल येथे मतमोजणीसाठी हजर होते. प्रत्येक टेबलाजवळ एकेक प्रतिनिधी प्रत्येक फेरीतील मतांची नोंद करून घेत होता. प्रत्येक फेरी झाल्यावर स्पीकरवरून निकाल जाहीर केले जात होते. कार्यकर्त्यांमध्ये क्षणाक्षणाला घालमेल, धाकधूक आणि हुरहूर वाढत होती. विजयी उमेदवारांच्या कार्यकर्त्यांचा जल्लोष आणि पराभूत उमेदवारांची निराशा असे संमिश्र वातावरण मतमोजणी केंद्रामध्ये पाहायला मिळाले. विजेत्या उमेदवारांच्या कार्यकर्त्यांनी केंद्रापासून 100 मीटर अंतरावर गुलाल, फटाके, सजवलेली गाडी अशी जय्यत तयारी करून ठेवली होती. प्रभागाचा निकाल पूर्ण झाल्यावर विजयी उमेदवार बाहेर येताक्षणीच त्यांना उचलून जल्लोष करत मुख्य रस्त्यावर मिरवणुका काढल्या जात होत्या. त्यामुळे गोयल गंगा चौकापासून अभिरुची मॉलपर्यंत दिवसभर वाहतूक कोंडी झाली होती.
प्रभाग 33 मधील 'क' गटात चुरशीची लढत
प्रभाग क्र. 33 मधील मतमोजणीच्या वेळी 'क' गटातील प्रत्येक फेरीगणिक उत्सुकता वाढत होती. भाजपचे उमेदवार सुभाष नाणेकर आणि राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट) पक्षाचे उमेदवार संदीप मते यांच्यात चुरशीची लढत पाहायला मिळाली. पहिल्या तीन फेऱ्यांमध्ये मते आघाडीवर होते. चौथ्या फेरीपासून नाणेकर यांनी आघाडी घेतली आणि अत्यंत चुरशीच्या लढतीत नाणेकर यांनी 539 मतांनी विजय मिळवला. नाणेकर यांना 25 हजार 556 तर, मते यांना 25 हजार 17 मते मिळाली.
माध्यम प्रतिनिधींची गैरसोय
मतमोजणीच्या दिवशी केंद्रात माध्यम प्रतिनिधींची वेगळी व्यवस्था केली नव्हती. सुरुवातीला प्रतिनिधींना रोडवर उभे राहून स्पीकरवरून आकडेवारी नोंदवून घ्यावी लागत होती. आत जायचे असल्यास मोबाईल बाहेर ठेवून जाण्याबाबत पोलिस हुज्जत घालत होते. निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांशी वारंवार संपर्क साधल्यावर प्रवेशद्वाराच्या बाजूला प्रतिनिधींना बसण्याची परवानगी मिळाली. पाणी, जेवण, स्वच्छतागृह अशी कोणतीही व्यवस्था नसल्याने गैरसोयीचा सामना करावा लागला.
विजयी उमेदवार:
प्रभाग क्रमांक 33 - शिवणे, खडकवासला, धायरी (पार्ट)
अ गट - धनश्री कोल्हे - भाजप
ब गट - अनिता इंगळे - राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार)
क गट - सुभाष नाणेकर - भाजप
ड गट - सोपान ऊर्फ काका चव्हाण - राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार)
प्रभाग 34 - नऱ्हे-वडगाव बुद्रुक-धायरी
अ गट - हरिदास चरवड - भाजप
ब गट - कोमल नवले - भाजप
क गट - जयश्री भूमकर - भाजप
ड गट - राजू लायगुडे - भाजप
प्रभाग 35 - सनसिटी माणिकबाग
अ गट - ज्योती गोसावी - भाजप
ब गट - मंजुषा नागपुरे - भाजप - बिनविरोध
क गट - सचिन मोरे - भाजप
ड गट - श्रीकांत जगताप - भाजप