पुणे: एकाच महिन्यात दोनदा बॉम्बने न्यायालय उडविण्याच्या धमक्या आणि आता न्यायालयाबाहेर भर दिवसा गोळीबारासह कोयत्याने झालेला हल्ला, यामुळे शिवाजीनगर जिल्हा व सत्र न्यायालयाच्या सुरक्षाव्यवस्थेवर गंभीर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. न्याय मिळविण्यासाठी दररोज हजारो नागरिकांची वर्दळ असलेल्या न्यायालय परिसरातच अशा घटना घडत असल्याने न्यायाधीश, वकील, कर्मचारी, पक्षकार आणि साक्षीदारांच्या सुरक्षिततेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे.
जिल्हा न्यायालयाला २ आणि २३ नोव्हेंबर रोजी बॉम्बने उडविण्याच्या धमकीचे ई-मेल आले होते. दोन्ही वेळा न्यायालयीन कामकाज थांबवून इमारती रिकाम्या करण्यात आल्या. या घटनांनंतर अवघ्या दोन दिवसांत बुधवारी (दि. २५) न्यायालयाबाहेर तरुणावर गोळीबाराचा प्रयत्न करून कोयत्यांनी जीवघेणा हल्ला करण्यात आला. त्यामुळे न्यायालयाच्या आवारासह प्रवेशद्वार आणि बाहेरील परिसरातील सुरक्षा अधिक सक्षम करण्याची गरज अधोरेखित झाली आहे.
ॲड. विकास शिंदे म्हणाले, “न्यायालयाच्या दारातच आरोपीवर प्राणघातक हल्ला होत असेल, तर सुरक्षाव्यवस्थेचा उपयोग काय? वकील, पक्षकार, साक्षीदार आणि आरोपींची सुरक्षा धोक्यात आली आहे. पोलिसांनी गुन्हा घडल्यानंतर तपास करण्यापुरते मर्यादित न राहता गुन्हेगारी टोळ्यांवर कठोर कारवाई करून न्यायालयाची सुरक्षा तातडीने सक्षम करावी.”
न्यायालयात येणाऱ्या पक्षकारांच्या मनात सुरक्षिततेबाबत विश्वास असला पाहिजे. न्यायालयाबाहेर घडलेली गोळीबाराची घटना अत्यंत गंभीर आहे. न्यायाधीश, वकील आणि पक्षकारांच्या सुरक्षिततेसाठी व्यापक सुरक्षाव्यवस्था उभारण्याची आवश्यकता आहे.ॲड. संतोष खामकर, माजी अध्यक्ष, पुणे बार असोसिएशन
बॉम्बच्या धमक्यांमुळे न्यायालयीन कामकाज विस्कळीत होत असतानाच आता गोळीबाराची घटना घडली आहे. प्रत्येक घटनेनंतर काही दिवस सुरक्षा वाढविण्यापेक्षा कायमस्वरूपी सुरक्षा धोरण आखले पाहिजे. न्यायालय प्रशासन, पोलिस आणि वकील संघटनेने एकत्रित निर्णय घेणे गरजेचे आहे.ॲड. विक्रांत कदम, फौजदारी वकील
न्यायालय परिसरातील संभाव्य धोके लक्षात घेऊन प्रतिबंधात्मक उपाययोजनांवर पोलिसांनी भर द्यायला हवा. न्यायालयीन कामकाज निर्भय वातावरणात पार पडण्यासाठी सुरक्षाव्यवस्थेला सर्वोच्च प्राधान्य देणे आवश्यक आहे.ॲड. हर्षल पाटील, फौजदारी वकील