खोर : पुण्याच्या शिल्पा जाधव-घुले हिने आपल्या आत्मविश्वास, कष्ट आणि मेहनतीच्या बळावर अमेरिकेच्या व्यासपीठावर भारताचा झेंडा अभिमानाने फडकवला आहे. अलीकडेच झालेल्या मिसेस युनिव्हर्स अमेरिका या प्रतिष्ठित स्पर्धेत तिने मिसेस एलीट युनिव्हर्स अमेरिका या उपविजेतेपदासह मिसेस न्यूयॉर्क युनिव्हर्स, मिसेस न्यूयॉर्क वर्ल्ड, लोकप्रिय व्यक्तिमत्त्व पुरस्कार, वर्षातील उद्योजिका आणि ग्लॅमर आयकॉन 2025 असे बहुमान मिळवले. पुण्याच्या मातीत रुजलेली आणि न्यूयॉर्कच्या आकाशात झळकणारी ही तेजस्वी मराठी महिला शिल्पा जाधव-घुले आज जागतिक पातळीवर भारतीय स्त्रीशक्तीचे जिवंत प्रतीक ठरली आहे.(Latest Pune News)
सौंदर्याची झळाळी आणि संस्कारांची ऊब या दोन्हींचा सुंदर मिलाफ शिल्पाच्या व्यक्तिमत्त्वात दिसून येतो. ती केवळ एक विजेती नाही, तर आयटी क्षेत्रातील कुशल व्यावसायिक, इव्हेंट आयोजक, समाजसेविका आणि भारतीय संस्कृतीची जागतिक दूत आहे. अमेरिकेतील ढोल ताशा पथक या संस्थेची ती संस्थापक असून गेली अनेक वर्षे भारतीय सण, परंपरा आणि एकतेचे रंग अमेरिकेच्या भूमीत फुलवत आहे.
तिच्या मते कुटुंब हीच खरी शक्ती. पती कल्याण घुले आणि जुळ्या मुलींच्या साथीत ती काम, समाजसेवा आणि कौटुंबिक जीवनाचा सुंदर समतोल राखते. ती ठामपणे म्हणते, खरी सक्षमता ही जाणीव, करुणा आणि कृतीतून येते. प्रत्येक स्त्री आपल्या प्रयत्नांनी समाज बदलू शकते. घरगुती हिंसाचारग््रास्त महिला, मानसिक ताणाशी झुंज देणारे विद्यार्थी आणि गरीब मुलांसाठी कार्य करणारी शिल्पा आज हजारो महिलांसाठी प्रेरणादायी दीप ठरली आहे.