पुणे: गोखले राज्यशास्त्र आणि अर्थशास्त्र संस्थेने तिची मातृसंस्था असलेल्या सर्व्हंट्स ऑफ इंडिया सोसायटीवर प्रशासक नेमण्याची मागणी केली आहे. तसेच आर्थिक अनियमितता प्रकरणात अध्यक्ष दामोदर साहू यांचेही नाव सहआरोपी म्हणून नोंदवण्याची मागणी पोलिसांकडे करण्यात आल्याची माहिती गोखले राज्यशास्त्र आणि अर्थशास्त्र संस्थेचे प्रभारी उपकुलसचिव विशाल गायकवाड यांनी गुरुवारी पत्रकार परिषदेत दिली.
सर्व्हंट्स ऑफ इंडिया सोसायटी, गोखले राज्यशास्त्र आणि अर्थशास्त्र संस्था या दोन्ही संस्थांना मोठा ऐतिहासिक वारसा आहे. मात्र, गेल्या काही काळापासून या दोन्ही संस्थांतील आर्थिक अनियमिततेच्या मुद्द्यावरून चर्चेत आहेत. मात्र, आता या दोन्ही संस्था परस्परांवर आरोप-प्रत्यारोप करत असल्याचे चित्र आहे.
गायकवाड म्हणाले, विद्यापीठ अनुदान आयोगाच्या नियमानुसार, अभिमत विद्यापीठाच्या प्रायोजक संस्थेचा विद्यापीठाच्या बँक खात्यांवर अधिकार नाही. मात्र, सर्व्हंट्स ऑफ इंडिया सोसायटीने विद्यापीठाचे खाते गोठवल्याची माहिती बँकेतन मिळाली. ते खाते पुन्हा सुरू करून घेण्यात आले. मात्र, या प्रकारामुळे नियमाचे उल्लंघन झाले. गोखले संस्थेतून सर्व्हंट्स ऑफ इंडिया सोसायटीसाठी बेकायदा १.४२ कोटी रुपये वळवल्याच्या प्रकरणात अध्यक्ष दामोदर साहू यांचेही नाव समाविष्ट करण्याची मागणी डेक्कन पोलिसांकडे केली आहे. सर्व्हंट्स ऑफ इंडिया सोसायटीचे संचालक मंडळ बरखास्त करून संस्थेवर प्रशासक नेमण्याची मागणी धर्मादाय आयुक्तांकडे केली आहे. तसेच सर्व्हंट्स ऑफ इंडिया सोसायटीने नेमलेली सल्लागार समितीही बेकायदा आहे.
दरम्यान, गोखले संस्थेने संयुक्त बँक खात्याची वर्षानुवर्षे असलेली पद्धत एकतर्फी पद्धतीने मोडीत काढली. या बदलाबाबत सर्व्हंट्स ऑफ इंडिया सोसायटीला कळववण्यात आले नाही. त्यामुळे बँकेला पत्र लिहिले. तसेच सल्लागार समिती दोन्ही संस्थांतील समन्वयासाठी असल्याचे स्पष्टीकरण साहू यांनी दिले आहे.