पुणे : आम्ही एका दहशतवादी संघटनेच्या चेअरमनला पकडले आहे. त्याने 247 लोकांची नावे दिली आहेत.
त्यामध्ये तुमचे नाव आहे. तुमचे आधार कार्ड दहशतवादी कृत्य आणि मनी लॉन्ड्रींगमध्ये वापरले आहे, असा धाक दाखवत सायबर ठगांनी पाषाणमधील 80 वर्षीय ज्येष्ठाकडून 20 लाख 65 हजार रुपये उकळल्याचा प्रकार समोर आला आहे. याप्रकरणी, फसवणूक झालेल्या ज्येष्ठाने चतुःशृंगी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार पोलिसांनी सायबर ठगाच्या विरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी ज्येष्ठाला सायबर ठगाने पोलिस गणवेश परिधान करून व्हिडीओ कॉल केला. त्याने सायबर क्राईम कुलाबा येथून बोलत असल्याचे सांगितले. तुमच्या फोनवरून अश्लील मेसेज पाठवले आहेत. त्याची तक्रार आमच्याकडे आली आहे, असे सांगितले. त्यानंतर फिर्यादींना तुमचे आधार कार्ड, मनीलॉन्ड्रींग आणि दहशतवादी कृत्यासाठी वापरला आहे.
एका दहशतवादी संघटनेच्या चेअरमनला आम्ही पकडले आहे. त्याने दिलेल्या यादीत तुमच्या नावाचा समावेश आहे. त्याने सांगितले की, या यादीतील लोकांना मी दहा टक्के पैसे दिले आहेत. तुमच्या बँक खात्यात असे अडीच कोटी रुपये आले आहेत. त्यामुळे अटक करावी लागेल, अशी सायबर ठगाने फिर्यादींना भीती दाखवली.
त्यानंतर विविध तपासणीच्या नावाखाली आणि अटक न करण्यासाठी फिर्यादींकडून 20 लाख 65 हजार रुपये सायबर ठगांनी उकळल्याचे फिर्यादीत म्हटले आहे.