पुणे

पुण्यातील शास्त्रज्ञाने ‘हर्बल सिगारेट’चे पेटंटही मिळवले!

अमृता चौगुले

पुणे : पुढारी वृत्तसेवा

तंबाखूचे व्यसन सुटावे यासाठी निकोटीनसारख्या पर्यायाचा विचार केला गेला. मात्र, हे देखील आरोग्यासाठी हानिकारक असल्याचे दिसून आले. या सर्व बाबींचा विचार व अभ्यास करून पुण्यातील एका व्यक्तीने तंबाखूविरहित 'हर्बल सिगारेट' बनवून जागतिक पातळीवर पुण्याचे नाव कोरले आहे. याच संशोधनाचे नुकतेच (21 ऑक्टोबर 2021) पेटंट मिळवल्याने त्यांच्या या उत्पादनास फ्लिपकार्ट, अमेझॉन, व मिशो यासारख्या प्लॅटफॉर्मवर भारतासह विदेशातूनही मागणी होत आहे.

तंबाखूचे व्यसनात भारताच जगात दुसरा क्रमांक लागतो. 31 मे (मंगळवारी) ला जगभरात तंबाखूविरोधी दिन साजरा होईल. या दिनानिमित्ताने जागतिक आरोग्य संघटनेने (डब्ल्यूएचओ) 'तंबाखू : आपल्या पर्यावरणाला धोका' ही संकल्पना मांडली असून त्याभोवती कार्यक्रमांचे आयोजन केले आहे. भारतातील 26 कोटी 70 लाख प्रौढांना (15 वर्षे वयावरील) तंबाखूचे व्यसन असल्याचे 2016-17 मधील ग्लोबल अ‍ॅडल्ट टोबॅको सर्व्हे इंडिया यांच्या अहवालात नमूद आहे.

तंबाखू ब्रिटिशांनी भारतात आणली…

सर्वप्रथम ब्रिटिशांनी तंबाखू भारतात आणली. नगदी पीक म्हणून त्यांनी तंबाखूचा भारतात प्रसार केला. कीटकनाशके बनविण्यासाठी तंबाखू पिकाचा प्रामुख्याने वापर केला जात असे. प्राण्यांपासून पिकाचे रक्षण व्हावे, यासाठीही भारतीय शेतकरी तंबाखूचा वापर करीत असे.

या व्यसनापासून मुक्तता मिळवायची असेल, तर आयुर्वेदशास्त्राचा आधार घेऊन बनविलेले 'हर्बल धूमपान' हे उत्पादन उपयुक्त ठरू शकते. ही एक हर्बल स्मोक उपचार पद्धत आहे. यामध्ये वाळलेल्या गोलकांडीचा वा वातीचा वापर केला जातो. आयुर्वेदात उल्लेखलेल्या पद्धतीनुसार शास्त्रोक्त पद्धतीने औषधी वनस्पतींच्या मिश्रणाचा वापर करून धूम्रपानाची निर्मिती करण्यात आली आहे. 'धूम-वर्ती' असे या कांडीचे नाव असून, तिचे आता सिगारेटमध्ये रूपांतर करण्यात आले आहे.

या उत्पादनातील घटकपदार्थांची अत्यंत काळजीपूर्वक निवड करण्यात आली असून, या धूम-वर्तीच्या सेवनाने शास्त्रीय पद्धतीनुसार धूम्रपानाचे वा तंबाखू खाण्याचे व्यसन सुटू शकते, असा दावाही करण्यात आला आहे.
आयुर्वेदासारख्या प्राचीन भारतीय शास्त्रात जर आरोग्यवर्धनासाठी तसेच प्राणघातक व्यसनांपासून मुक्ती मिळविण्यासाठी उत्तमोत्तम पर्याय उपलब्ध असताना मी तंबाखू आणि निकोटिनयुक्त पदार्थांच्या व्यसनाला बळी पडून माझ्या निरोगी शरीराला आजाराच्या विळख्यात का अडकवू, हा प्रश्न प्रत्येकाने स्वतःला विचारायला हवा.

                              – डॉ. राजस नित्सुरे, संचालक आणि मुख्य शास्त्रज्ञ,                                  अनंतवेद रिसर्च लॅब्ज प्रा. लि.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT