Junk Food Ban Pudhari
पुणे

Junk Food Ban: शाळांना 'जंक फूड'चा विळखा! विद्यार्थ्यांच्या आरोग्याशी खेळ; अन्न व औषध प्रशासनापुढे निर्बंध घालण्याचे आव्‍हान

अन्न व औषध प्रशासनाचे (एफडीए) आयुक्त तुकाराम मुंढे यांनी विद्यार्थ्यांच्या आरोग्याचा विचार करून शाळांच्या १०० मीटर आवारात 'जंक फूड' विक्रीस कठोर बंदी घालण्याचे आदेश दिले आहेत.

पुढारी वृत्तसेवा

पुणे: अन्‍न व औषध प्रशासन विभागाचे आयुक्‍त तुकाराम मुंढे यांनी शाळा व महाविद्यालयापासून ५० मीटरच्या आवारात जंक आणि फास्‍ट फूडच्या विक्रीला तसेच जाहिरातीला बंदीची घोषणा बुधवारी केली. या पार्श्वभूमीवर दै. 'पुढारी'च्या टीमने आज (गुरुवारी) शहरातील विविध शाळा आणि महाविद्यालयांच्या परिसराची पाहणी केली.

ही सर्व शैक्षणिक संकुले 'जंक फूड'च्या विळख्यात असल्याचे या पाहणीतून पुढे आले आहे. आता अन्‍न व औषध प्रशासनापुढे त्‍यावर निर्बंध घालण्याचे आव्‍हान उभे आहे. प्रशासन हे आव्‍हान कसे पेलते याकडे सर्वांचे लक्ष आहे . 'पुढारी'च्या पाहणीत पुढे आलेला हा 'आँखो देखा हाल.

अन्न व औषध प्रशासनाचे (एफडीए) आयुक्त तुकाराम मुंढे यांनी विद्यार्थ्यांच्या आरोग्याचा विचार करून शाळांच्या १०० मीटर आवारात 'जंक फूड' विक्रीस कठोर बंदी घालण्याचे आदेश दिले आहेत.

मात्र, या आदेशाला पुण्यात काही विक्रेत्यांनी केराची टोपली दाखवल्याचे समोर आले आहे. दैनिक 'पुढारी'च्या वतीने गुरुवारी (दि.३०) मध्यवस्तीतील नारायण पेठ भागातील शाळांची प्रत्यक्ष पाहणी करण्यात आली असता, अनेक शाळांच्या जवळच जंक फूडची विक्री सुरू असल्याचे चित्र पाहायला मिळाले.

​नारायण पेठेतील न्यू इंग्लिश स्कूल, रमणबाग शाळेच्या जवळच विविध प्रकारची जंक फूडची दुकाने थाटलेली दिसून आले. लहान मुले या अस्वच्छ व तेलकट पदार्थांकडे आकर्षित होत असून, प्रशासनाच्या कारवाईचा कोणताही धाक उरलेला नसल्याचे दिसत आहे.

याच भागातील गोगटे शाळेच्या आसपासही तीच परिस्थिती पाहायला मिळाली. शाळा सुटण्याच्या आणि भरण्याच्या वेळेत या दुकानांवर विद्यार्थ्यांची गर्दी जमलेली असते. ​याशिवाय, मध्यवस्तीतील भावे हायस्कूलच्या परिसरातही पाहणीदरम्यान सर्रास जंक फूड विकले जात असल्याचे पाहायला मिळाले.

तुकाराम मुंढे यांच्या या धडक निर्णयाचे पालकांनी आणि शिक्षणप्रेमींनी स्वागत केले असले, तरी स्थानिक पातळीवर अंमलबजावणी शून्य असल्याचे दिसत आहे. फक्त कागदावर आदेश न काढता अन्न व औषध प्रशासनाने महापालिकेच्या सहकार्याने प्रत्यक्ष मैदानात उतरून या जंक फूड विक्रेत्यांवर कठोर कारवाई करावी.
- आनंद सप्तर्षी, रहिवासी, नारायण पेठ

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT