नसरापूर: पुणे-सातारा महामार्गाच्या व्यवस्थापनाकडे राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण (एनएचएआय) व रिलायन्स इन्फ्रा यांनी दुर्लक्ष केल्यामुळे अनेक समस्या निर्माण होत आहेत. योग्य ड्रेनेज व्यवस्था आणि नियमित देखभाल न केल्याने गुरुवारी (दि. 15) पावसाचे पाणी महामार्गावरून मोठ्या प्रमाणात वाहत होते.
रखडलेले रुंदीकरण, ढिसाळ नियोजन, जागोजागी अर्धवट कामे, यामुळे महामार्गासह सेवा रस्त्यांवर पावसाच्या पाण्याचे लोट वाहत होते. हीच परिस्थिती कायम राहिल्यास महामार्गावर जीवितहानी घटना घडण्याची भीती व्यक्त होत आहे. (Latest Pune News)
पुणे-सातारा महामार्ग पट्ट्यात गेल्या 2 दिवसांपासून तुरळक पाऊस पडत आहे. मात्र, गुरुवारी दुपारी दीड तास विजेच्या कडकडाटासह पावसाने धुमाकूळ घातला. मोर्यांमध्ये मोठ्या प्रमाणात राडारोडा साचल्याने पावसाच्या पाण्याचे लोट महामार्गासह सेवा रस्त्यांवरून वेगाने वाहत आले.
त्यामुळे वाहनचालकांसह प्रवाशांचे प्रचंड हाल झाले. चेलाडी फाटा, केळवडे, वरवे, शिवरे, खोपी-बोरमाळ, टोलनाका तसेच दर्गा फाटा, कोंढाणपूर फाटा, वेळू, शिंदेवाडी या ठिकाणच्या सेवा रस्त्यांवरून नाल्याहून अधिक पातळीने पाणी वाहत होते. तर रस्त्यावर साचलेल्या पाण्याचा अंदाज न आल्याने शिवापूर येथे 4 वाहनांचा अपघात झाला होता, त्यामुळे वाहतूककोंडी झाली होती.
राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाचे प्रकल्प संचालक यांच्या अक्षम्य दुर्लक्षमुळे ठेकेदारकडून पुणे-सातारा महामार्गाचे रुंदीकरणाचे तीनतेरा वाजले आहे, असा आरोप स्थानिकांसह वाहनचालक, प्रवाशांकडून केला जात आहे. त्यातच पावसाळा तोंडावर आला असतानाही महामार्ग आणि सेवा रस्त्यांची नियमित देखभाल न झालेली नाही. त्यामुळे गेल्या दोन दिवस पडत असलेल्या जोरदार पावसामुळे महामार्ग अक्षरशः पाण्यात गेल्याचे चित्र दिसून येत आहे.
शिंदेवाडीची पुनरावृत्ती नको
14 वर्षांपूर्वी म्हणजे 6 जून 2013 रोजी पुणे-सातारा महामार्गावरील शिंदेवाडी (ता. भोर) येथे कात्रज बोगद्यानजीक पावसाचे पाणी वाहून जाणारे मार्ग बंद झाल्याने त्याठिकाणी पूरसदृश परिस्थिती निर्माण झाली होती. त्यात संस्कृती-विशाखा वाडेकर या मायलेकींचा बळी गेला होता. सन 2013 सारखी महामार्गाची अवस्था झाली असून, महामार्गावरील चढ-उताराला असलेल्या सेवा रस्त्यावरील मोर्या व इतर देखभालीची कामे करणे गरजेचे आहे. मात्र, एनएचआय आणि रिलायन्स इन्फ्रा या कंपनीने मान्सूनपूर्व कामे करण्यावर यावर्षी खबरदारी घेतलेली दिसत नाही.
अनुचित घटना टाळण्यासाठी महामार्ग प्राधिकरणाचे प्रकल्प संचालक व संबंधित ठेकेदार यांना मान्सूनपूर्व महामार्ग व सेवा रस्त्याचे दुरुस्तीचे काम करण्यासाठी तातडीने आदेश देण्यात येणार आहे.- डॉ. विकास खरात, प्रातांधिकारी, भोर
महामार्ग रस्त्याचे दुरुस्ती-देखभाल केली जात असून, महामार्ग रस्त्यावरील दुरुस्तीचे काम येत्या 15 दिवसांत पूर्ण केले जाईल. खड्डे पडलेल्या व ड्रेनेज दुरुस्ती केली जाईल.- अमित भाटिया, महाव्यवस्थापक, रिलायन्स इन्फ्रा