पती-पत्नीचा मृत्यू प्रकरण: सह्याद्री रुग्णालयाच्या निष्काळजीची होणार चौकशी; आरोग्य विभागाने धाडली नोटीस Pudhari
पुणे

पती-पत्नीचा मृत्यू प्रकरण: सह्याद्री रुग्णालयाच्या निष्काळजीची होणार चौकशी; आरोग्य विभागाने धाडली नोटीस

वैद्यकीय निष्काळजीपणाबाबतही चौकशी केली जाणार आहे.

पुढारी वृत्तसेवा

पुणे: यकृत प्रत्यारोपण शस्त्रक्रियेनंतर आठवड्याच्या आतच पती-पत्नी दोघांचा मृत्यू झाल्याने वैद्यकीय क्षेत्रात खळबळ उडाली आहे. या गंभीर प्रकरणाची दखल घेत आरोग्य विभागाने डेक्कन येथील सह्याद्री रुग्णालयाला खुलासा करण्याची नोटीस बजावली आहे. पुणे परिमंडळाचे प्रभारी आरोग्य उपसंचालक डॉ. नागनाथ यमपल्ले यांच्या स्वाक्षरीने हीनोटीस दिली आहे. वैद्यकीय निष्काळजीपणाबाबतही चौकशी केली जाणार आहे.

हडपसर येथील बापू बाळकृष्ण कोमकर (48) यांना यकृत निकामी झाल्याने प्रत्यारोपणाची गरज होती. पत्नी कामिनी (42) यांनी त्यासाठी यकृतदान करण्यास स्वेच्छेने तयारी दर्शवली. मात्र 15 ऑगस्ट रोजी शस्त्रक्रियेनंतर बापू यांचा मृत्यू झाला. उपचार सुरू असतानाच 22 ऑगस्ट रोजी कामिनी यांचेही निधन झाले. शनिवारी ससून रुग्णालयात त्यांचे शवविच्छेदन करण्यात आले असून अहवाल अद्याप प्रलंबित आहे. (Latest Pune News)

आठवड्यातच दोन्ही पालकांचे निधन झाल्याने कोमकर दाम्पत्याचा 21 वर्षीय मुलगा आणि 14 वर्षांची मुलगी पोरकी झाली आहेत. प्रत्यारोपणासाठी तब्बल 20 लाख रुपये खर्च आला होता. त्यासाठी कोमकर दाम्पत्याने आपली सदनिका गहाण ठेवली होती. बापू घरातील एकमेव कमावते होते, अशी माहिती नातेवाईकांनी दिली.

कामिनी यांना मानसिक धक्का लागू नये म्हणून पतीच्या मृत्यूची माहिती त्यांना दिली नव्हती, असे त्यांच्या भावाने बलराज वाडेकर यांनी सांगितले. नातेवाईकांनी रुग्णालयावर शस्त्रक्रियेत आणि त्यानंतरच्या उपचारांत निष्काळजीपणाचा आरोप करत गुन्हा दाखल करण्याची मागणी केली आहे. खासगी रुग्णालयांना प्रत्यारोपणाची परवानगी आरोग्य उपसंचालक कार्यालयाकडून दिली जाते. त्यामुळेच या घटनेची चौकशी करून खुलासा करण्याची प्रक्रिया सुरू असल्याचे सांगण्यात आले.

सह्याद्री रुग्णालय प्रशासनातर्फे सांगण्यात आले की, ‘या कठीण प्रसंगी आम्ही कुटुंबीयांप्रती मनःपूर्वक संवेदना व्यक्त करतो. आम्हाला उपसंचालकांकडून नोटीस मिळाली आहे. या चौकशीत आम्ही पूर्णपणे सहकार्य करीत आहोत. या प्रकरणाचा सखोल व पारदर्शक तपास व्हावा यासाठी आवश्यक सर्व माहिती व मदत पुरविण्याबाबत आम्ही कटिबद्ध आहोत.’

सह्याद्री रुग्णालयाला संबंधित घटनेचा तातडीने खुलासा करण्याबाबत नोटीस पाठवण्यात आली आहे. रुग्णाच्या नातेवाईकानेच अवयवदान केले असल्याने अशी प्रकरणे प्रादेशिक समन्वय समितीकडे येत नाहीत. यासाठी रुग्णालयाची अंतर्गत समिती कार्यरत असते. समिती सर्व कागदपत्रे तपासून प्रत्यारोपणासाठी मंजुरी देण्याचे काम करते. शस्त्रक्रियेदरम्यान किंवा उपचारांबाबत काय घडले, याबाबत आता चौकशी होणार आहे. रुग्ण आणि दाता यांमधील नाते, अवयव मॅच झाले का, याबाबत सखोल पाहणी केली जाणार आहे. याशिवाय, वैद्यकीय निष्काळजीपणाबाबतही चौकशी केली जाईल.
- डॉ. नागनाथ यमपल्ले, प्रभारी आरोग्य उपसंचालक

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT