

Malaria and dengue prevention steps
पुणे: पावसाळा सुरू असल्याने डेंग्यू, चिकुनगुनियासह कीटकजन्य आजारांचा प्रादुर्भाव वाढला आहे. यावर्षी राज्यभरात रुग्णसंख्या वाढल्याने आरोग्य विभागाने तातडीने पावले उचलली आहेत. शुक्रवारी आरोग्य विभागाने सर्व महापालिका, जिल्हा परिषदा आणि स्थानिक स्वराज्य संस्थांना नवी मार्गदर्शक तत्त्वे पाळण्याच्या सूचना दिल्या. त्यानुसार, आरोग्य कर्मचारी घरोघरी जाऊन तपासणी करणार आहेत.
सार्वजनिक आरोग्य विभागाच्या नियमावलीतून प्रतिबंधात्मक उपाययोजना, जलद प्रतिसाद पथके आणि जनजागृती मोहिमांवर विशेष भर देण्यात आला आहे. आरोग्य कर्मचार्यांना दररोज घराघरांत जाऊन सर्वेक्षण करून तापाच्या संशयित रुग्णांची माहिती संकलित करायची आहे. प्रत्येक गावात आठवड्याला डासांची तपासणी (व्हेक्टर सर्व्हे) करणे बंधनकारक करण्यात आले आहे. स्थानिक पातळीवर डासांची उत्पत्तीस्थळे शोधून लगेच नष्ट करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. (Latest Pune News)
या वर्षी 1 जानेवारी ते 21 ऑगस्टपर्यंत राज्यात 5,962 डेंग्यू व 1,945 चिकनगुनिया रुग्णांची नोंद झाली आहे. त्यामुळे उच्च जोखमीची गावे व शहरी भाग तातडीने ओळखून तेथे डास नियंत्रणाचे नियोजन करण्यास सांगण्यात आले आहे. गावांमध्ये आठवड्याला डास तपासणी, रुग्णालयांत औषधसाठा, दुर्गम भागांसाठी वाहनांची सोय आणि फॉगिंग मशिन तत्काळ वापरासाठी सज्ज ठेवणे आवश्यक आहे, असे सहसंचालक (आरोग्य सेवा) डॉ. संदीप सांगळे यांनी सांगितले.
जलद प्रतिसाद पथके सज्ज
जिल्हा रुग्णालये व प्राथमिक आरोग्य केंद्रांना तीन महिन्यांचा औषधसाठा कायम ठेवणे अनिवार्य करण्यात आले आहे. कुठल्याही भागात उद्रेक झाल्यास 24 तासांत प्रतिसाद देण्यासाठी डॉक्टर आणि सार्वजनिक आरोग्य तज्ज्ञांची जलद प्रतिसाद पथके तयार करण्यात आली आहेत. या पथकांची जबाबदारी तत्काळ रुग्ण तपासणी, औषधोपचार आणि रोगनियंत्रण उपाय राबवणे अशी असणार आहे.