पुणे: पुणे आरटीओकडून अमराठी रिक्षाचालकांच्या तपासणीसाठी नुकतीच विशेष मोहीम राबवण्यात आली आहे. त्या मोहिमेत ९५ रिक्षाचालकांची तपासणी करण्यात आली. त्यातील १० अमराठी रिक्षाचालकांना आरटीओच्या वायुवेग पथकाने तत्काळ नोटिसा देत, त्यांना मराठी भाषा प्रशिक्षण घेण्याच्या सक्त सूचना केल्या आहेत.
महाराष्ट्र शासनाच्या परिवहन विभागाने महाराष्ट्र मोटार वाहन नियम, १९८९ मध्ये महत्त्वपूर्ण सुधारणा केली आहे. त्यानुसार इलेक्ट्रॉनिक मीटर बसवलेल्या वाहनांच्या परमिटधारकांसह संबंधित वाहनचालकांना मराठी भाषेचे कार्यज्ञान असणे आवश्यक केले आहे.
संबंधित चालकाकडे मराठी भाषेचे आवश्यक ज्ञान नसल्याचे आढळून आल्यास, परवाना प्राधिकरणाकडून त्याला मराठी भाषेचे ज्ञान संपादन करण्यासाठी एक महिन्याची मुदत देण्यात येईल. या मुदतीत चालकाने आवश्यक भाषाज्ञान संपादन न केल्यास, कारणे दाखवा नोटीस बजावून त्याचा वाहनचालक परवाना ३ महिन्यांपर्यंत निलंबित करण्यात येईल. त्यानंतरही नियमांचे पालन न झाल्यास तो अधिकृतरीत्या कायमचा रद्द करण्याची कार्यवाही करण्यात येणार आहे.
तसेच, वाहनाच्या परमिट नूतनीकरणाच्या वेळी परमिटधारकाचे मराठी भाषेचे ज्ञान प्राधिकरणाच्या समाधानाप्रमाणे असणे आवश्यक राहणार आहे. संबंधित परमिटधारकांची मराठी भाषेची ज्ञानचाचणी प्रादेशिक परिवहन कार्यालयातील मोटार वाहन निरीक्षकांमार्फत घेण्यात येणार आहे.
ही चाचणी उत्तीर्ण होणे संबंधित परमिटधारकांसाठी अनिवार्य राहणार आहे. हा नियम महाराष्ट्र शासनाच्या राजपत्रातील असाधारण भाग चार-अ मध्ये दि. १२ ऑगस्ट २०२६ रोजी प्रसिद्ध करण्यात आला आहेत. या सुधारणांची सर्व संबंधित परमिटधारक व वाहनचालकांनी नोंद घ्यावी, असे आवाहन प्रादेशिक परिवहन कार्यालय, पुणे यांच्याकडून करण्यात आले आहे.