पुणे: पुण्यातील रस्त्यांवरून प्रवास करताना वाहनचालकांना बसणारे धक्के आता केवळ तक्रारींपुरते मर्यादित राहिलेले नाहीत, तर तंत्रज्ञानाच्या माध्यमातून त्यांची मोजदादही झाली आहे. अवघ्या एका आठवड्यात २४ हजार वाहनांच्या सर्वेक्षणातून तब्बल ९३ लाख धक्क्यांची नोंद झाली आहे. खड्डे, उंच-सखल चेंबर्स, गतिरोधक, रस्त्यांवरील उंचवटे आणि अन्य अडथळ्यांमुळे रस्त्यांची झालेली दुरवस्था या सर्वेक्षणातून समोर आली आहे. विशेष म्हणजे, आता या माहितीच्या आधारे महापालिकेच्या ७८ अभियंत्यांच्या पाहणीपासून प्रत्यक्ष दुरुस्तीच्या कामापर्यंतच्या हालचालींवर ॲपद्वारे लक्ष ठेवता येणार आहे.
ऑक्टोबर महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात प्रायोगिक तत्त्वावर हे सर्वेक्षण केले. त्यासाठी २४ हजार वाहनांकडून माहिती संकलित करण्यात आली. वाहनांना प्रवासादरम्यान बसणाऱ्या धक्क्यांची तीव्रता मोजून त्यांचे अचूक ठिकाण निश्चित करण्यात आले. त्यानंतर रस्त्यांवरील अडथळ्यांचे तीन प्रमुख प्रकारांत वर्गीकरण केले आहे. या सर्वेक्षणाचा डेटा चाचणी स्वरूपात संबंधित यंत्रणेला उपलब्ध करून देण्यात आला होता.
खड्ड्यांचे लोकेशन आणि छायाचित्रही उपलब्ध
या तंत्रज्ञानाचे वैशिष्ट्य म्हणजे केवळ वाहनांना बसलेल्या धक्क्यांची संख्या मोजून ही प्रक्रिया थांबत नाही. रस्त्यावरील दोष नेमका कोणत्या ठिकाणी आहे, त्याचे लोकेशन आणि छायाचित्रही प्रणालीमध्ये उपलब्ध होते. त्यामुळे संबंधित अभियंत्यांना त्या ठिकाणी प्रत्यक्ष पाहणी करून दुरुस्तीचे नियोजन करता येणार आहे. विशेषतः दुचाकीस्वार बहुतांश वेळा रस्त्याच्या डाव्या बाजूने प्रवास करतात. त्यामुळे रस्त्याच्या या भागातील खड्डे आणि अन्य दोष शोधण्यासाठीही हे सर्वेक्षण उपयुक्त ठरणार आहे.
७८ अभियंत्यांच्या कामावर ॲपद्वारे नजर
या प्रणालीचा वापर करण्यासाठी महापालिकेतील ७८ अभियंत्यांना प्रवेश देण्यात आला आहे. संबंधित अभियंत्यांनी त्यांच्या कार्यक्षेत्रात किती ठिकाणांची पाहणी केली, किती खड्ड्यांची नोंद घेतली आणि प्रत्यक्ष किती ठिकाणी दुरुस्तीची कामे केली, याची माहिती प्रशासनाला मिळू शकणार आहे. तसेच, वॉर्ड कार्यालय आणि कार्यक्षेत्रनिहाय खड्ड्यांची संख्या व त्यांचे लोकेशनही उपलब्ध होणार आहे. त्यामुळे केवळ तक्रारी आल्यानंतरच दुरुस्ती करण्याऐवजी अभियंत्यांना त्यांच्या भागातील रस्त्यांची स्थिती स्वतःहून तपासणे शक्य होणार आहे.
अडथळ्यांचे तीन प्रकारांत वर्गीकरण
या प्रणालीमध्ये रस्त्यांवरील अडथळ्यांचे कायमस्वरूपी घटक, तात्पुरते अडथळे आणि दुरुस्तीयोग्य दोष असे वर्गीकरण करण्यात आले आहे. कायमस्वरूपी घटकांमध्ये रम्बल स्ट्रिप, गतिरोधक आणि पुलांवरील एक्स्पान्शन जॉइंटचा समावेश आहे. तात्पुरत्या अडथळ्यांमध्ये बॅरिकेड्स, अचानक निर्माण झालेले अडथळे, तसेच वाहनचालकांना अचानक ब्रेक लावण्यास भाग पाडणाऱ्या परिस्थितींची नोंद करण्यात आली आहे. तर, दुरुस्तीयोग्य दोषांमध्ये खड्डे, रस्त्यांवरील उंचवटे, खचलेली चेंबर्स, रेस चेंबर्स आणि इतर खराब भागांचा समावेश आहे.
दुरुस्तीच्या खर्चाचे नियोजन शक्य
महापालिकेकडून दर वर्षी रस्त्यांच्या देखभाल आणि दुरुस्तीवर तब्बल १७७ कोटी रुपये खर्च केला जातो. एवढ्या मोठ्या प्रमाणात निधी खर्चूनही रस्ते खराब राहतात. कोणत्या भागात नेमकी किती दुरुस्ती आवश्यक आहे, याची अचूक माहिती उपलब्ध नसल्यास निधीच्या नियोजनात अडचणी येतात. आता सर्वेक्षणातून मिळालेल्या माहितीच्या आधारे कोणत्या रस्त्याला प्राधान्य द्यायचे, कोणत्या भागातील खड्डे तातडीने बुजवायचे आणि दुरुस्तीसाठी किती निधी आवश्यक आहे, याचे नियोजन करता येणार आहे.
नवीन रस्त्यांची गुणवत्ताही तपासता येणार
केवळ जुन्या रस्त्यांवरील खड्डे शोधण्यापुरतीच ही प्रणाली मर्यादित राहणार नाही. नव्याने तयार केलेल्या रस्त्यांची गुणवत्ता तपासण्यासाठीही तिचा उपयोग होऊ शकतो. रस्त्याचा उतार, चेंबरची उंची आणि रस्त्याची समतलता यांमधील त्रुटी तंत्रज्ञानाच्या साहाय्याने वेळीच शोधता येणार आहेत. त्यामुळे रस्ता तयार केल्यानंतर त्याची गुणवत्ता तपासणे, दोष आढळल्यास संबंधित ठेकेदाराकडून दुरुस्ती करून घेणे आणि भविष्यात रस्त्यांची देखभाल करणे अधिक प्रभावीपणे शक्य होणार आहे.