पुणे : महापालिकेने रस्तेखोदाईचा परवाना रद्द केल्यानंतर शहरातील खोदलेले रस्ते आणि पदपथ दुरुस्त करण्याची कामे ठेकेदारामार्फत सुरू आहेत. मात्र, ही दुरुस्ती अत्यंत निकृष्ट पद्धतीने होत असल्याचे समोर आले आहे. रस्ते बुजवताना दर्जाहीन साहित्य वापरले जात असून, केवळ वरवरची भर घालून कामाची पूर्तता दाखवली जात आहे. पदपथ फोडताना जेथे पेव्हिंग ब्लॉक बसविणे अपेक्षित होते, तेथे केवळ सिमेंट टाकून तात्पुरती डागडुजी करण्यात येत आहे. याकडे पालिका अधिकारीवर्गानेही दुर्लक्ष केल्याचे दिसते.
शहरात आपत्ती निवारणासाठी सीसीटीव्हीचे जाळे तयार करण्यासाठी महाप्रीतकडून रस्तेखोदाई केली जात आहे. तसेच पोलिसांच्या सीसीटीव्हीसाठी देखील रस्ते खोदण्यात आले होते. मात्र, खोदकामाच्या परवान्यामध्ये नमूद केलेल्या अटी व नियमांचे पालन ठेकेदाराने केले नाही. त्यामुळे रस्ते खोदकाम तत्काळ थांबविण्याचे आणि खोदलेले रस्ते तातडीने दुरुस्त करण्याचे आदेश पथ विभागाचे प्रमुख अनिरुद्ध पावसकर यांनी संबंधित ठेकेदाराला दिले होते. ‘आधी खोदलेले रस्ते दुरुस्त करा, नंतरच पुढील खोदकाम करा,’ अशी नोटीस ठेकेदाराला देण्यात आली होती. महापालिकेची नोटीस आल्यावर ठेकेदाराने रस्ते दुरुस्त करण्यास सुरुवात केली खरी; मात्र ही दुरुस्ती केवळ दिखावा म्हणून केली जात असल्याने ठेकेदाराला महापालिकेने बजावलेली नोटीस फार्स ठरली आहे.
शहरात अनेक ठिकाणी खोदलेले रस्ते ठेकेदारामार्फत बुजविण्यात येत आहेत. तर पदपथ देखील दुरुस्त केले जात आहेत. मात्र, रस्तेदुरुस्तीसाठी निकृष्ट दर्जाच्या मालाचा वापर करण्यात येत आहे. काही ठिकाणी सिमेंटद्वारे खड्डे बुजविले जात आहेत. सिमेंटमध्ये मातीमिश्रित वाळूचा वापर केला जात आहे. काही ठिकाणी पदपथ केबल टाकण्यासाठी फोडण्यात आले आहे. हे पदपथ पुन्हा पेव्हिंग ब्लॉकने शास्त्रशुद्ध पद्धतीने बुजविणे गरजेचे असताना ठेकेदाराने तसे न करता केवळ खड्ड्यांमध्ये सिमेंट टाकून दुरुस्ती केली आहे. पावसाळ्यात हे सिमेंट वाहून जाऊन पुन्हा पदपथ खराब होण्याची शक्यता आहे.
गृह विभागाच्या आदेशानुसार शहरात पोलिसांकडून सीसीटीव्हींचे जाळे निर्माण केले जाणार आहे. त्यासाठी केबल टाकण्यासाठी शहरभर खोदकाम केले गेले. आपत्ती व्यवस्थापनांतर्गत कमांड अँड कंट्रोल सेंटर उभारण्यासाठी केबल टाकण्यासाठी महाप्रीत कंपनीतर्फे खोदकाम केले आहे. या दोन्ही कामांसाठी शहरभर रस्तेच नव्हे, तर सुस्थितीत असलेले पदपथही खोदले आहेत. तर खोदकाम झाल्यानंतर रस्ते अथवा पदपथ पुन्हा योग्य पद्धतीने दुरुस्त केले जात नसल्याने सोसायट्यांच्या अथवा दुकानांच्या प्रवेशद्वारांमध्ये रस्ता पुन्हा पूर्ववत न करण्यात आल्याने याबाबत सातत्याने तक्रारी आल्याने रस्तेखोदाईचा ठेका महापालिकेने रद्द केला होता.
पथ विभागाच्या लेखी आदेशानंतरच पुढील खोदकाम सुरू करावे. ही नोटीस मिळताच दुरुस्तीची कामे सुरू करण्यात आली आहेत. ठेका रद्द केल्यावर रस्त्यांची दुरुस्ती ठेकेदार योग्य पद्धतीने करतो की नाही, यावर पालिकेच्या अधिकाऱ्यांनी लक्ष ठेवणे अपेक्षित आहे. मात्र, पथ विभागाच्या अधिकाऱ्यांनी याकडे दुर्लक्ष केले आहे
खोदलेला रस्ता डांबराचा असेल, तर त्यांचे डांबरीकरण करणे गरजचे आहे. पदपथ फोडला असेल, तर त्याच्यावर पेव्हींग ब्लॉक बसवणे गरजेचे आहे. ठेकेदार जर योग्य पद्धतीने दुरुस्तीची कामे करत नसेल, तर त्याच्यावर कारवाई करण्यात येईल.अनिरुद्ध पावसकर, प्रमुख पथविभाग