पुणे: शहरातील रस्त्यांची दिवसेंदिवस होत असलेली दुर्दशा आणि आगामी गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर आवश्यक नागरी व आपत्कालीन सुविधांकडे लक्ष वेधत राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या अर्बन सेलने महापालिका प्रशासनाला धारेवर धरले आहे. पुणेकरांना खड्डेमुक्त रस्ते देण्याबरोबरच गणेशोत्सवात पार्किंग, सुलभ शौचालये, रुग्णवाहिका आणि अग्निशमन दलाची सक्षम व्यवस्था करावी, अशी मागणी महापालिका आयुक्त नवलकिशोर राम यांच्याकडे करण्यात आली आहे.
अर्बन सेलच्या प्रदेशाध्यक्ष तथा माजी खासदार वंदना चव्हाण, प्रदेश समन्वयक नितीन व्ही. जाधव आणि पुणे शहराध्यक्ष तथा नगरसेवक स्वप्नील दुधाणे यांनी मंगळवारी आयुक्त नवल किशोर राम यांना याबाबत निवेदन दिले. या निवेदनानुसार शहरातील रस्त्यांची अवस्था वर्षागणिक अधिकच खराब होत असून, “रस्ता खड्ड्यांत आहे की रस्त्यात खड्डे आहेत,” असा प्रश्न पुणेकरांना पडल्याचे पहिल्या निवेदनात नमूद करण्यात आले आहे.
रस्त्यांचा दर्जा सुधारत नसल्याने महापालिकेच्या निविदा प्रक्रिया आणि कामांच्या गुणवत्ता नियंत्रणावरही अर्बन सेलने प्रश्नचिन्ह उपस्थित केला आहे. ठराविक अथवा जवळच्या ठेकेदारांना निविदा मिळाल्यानंतर रस्त्यांसह विविध कामांचा दर्जा घसरत असल्याचा आरोप निवेदनातून करण्यात आला आहे. महापालिकेतील कथित गैरप्रकारामुळे पुण्याची प्रतिमा मलिन होत असल्याचेही त्यात म्हटले आहे. “निविदा कोणालाही मिळो; मात्र, कामाची गुणवत्ता आणि दर्जा खालावता कामा नये,” अशी स्पष्ट भूमिका अर्बन सेलने घेतली आहे.
पुणेकरांना अतिक्रमणमुक्त शहर हवे
पुणेकरांना खड्डेमुक्त रस्ते, अतिक्रमणमुक्त शहर, सक्षम पावसाळी गटार व्यवस्था, दर्जेदार पदपथ आणि सलग सायकल ट्रॅक उपलब्ध करून देण्याची मागणी करण्यात आली आहे. प्रत्येक प्रभागात वृक्षारोपणासाठी स्वतंत्र जागा आरक्षित करावी. नागरिकांना परिसरातील समस्या क्षेत्रीय कार्यालयापर्यंत पोहोचविता याव्यात, यासाठी प्रभागनिहाय टोल-फ्री अथवा व्हॉट्सॲप संपर्क व्यवस्था सुरू करावी, अशी सूचनाही करण्यात आली आहे. शहरात सायकल स्पर्धा किंवा एखादा विशेष कार्यक्रम आयोजित केल्यानंतर संबंधित मार्गांची तातडीने दुरुस्ती आणि स्वच्छता केली जाते. मग हीच तत्परता शहरातील सर्व रस्त्यांबाबत कायमस्वरूपी का दाखविली जात नाही, असा सवाल अर्बन सेलने केला आहे.
गणेशोत्सवासाठी स्वतंत्र नियोजनाची मागणी
आगामी गणेशोत्सवाच्या काळात पुणे शहरासह उपनगर आणि ग्रामीण भागातून मोठ्या संख्येने नागरिक मध्यवर्ती पुण्यात गणेश मंडळांचे देखावे पाहण्यासाठी येतात. त्यामुळे त्यांच्या वाहनांसाठी पुरेशी व नियोजित पार्किंग व्यवस्था करावी. महिला, ज्येष्ठ नागरिक, दिव्यांग आणि लहान मुलांसाठी स्वच्छ व सुलभ शौचालये उपलब्ध करून द्यावीत, या प्रकारच्या आदी मागण्या अर्बन सेलने महापालिकेकडे केल्या आहेत.