पुणे : शहरात विविध कामांसाठी वारंवार रस्ते खोदले जातात. यामुळे रस्ते नादुरुस्त होऊन त्यावर खड्डे पडतात. रस्ता तयार करताना ड्रेनेजची कामेदेखील होणे अपेक्षित असते. मात्र, ड्रेनेज आणि रस्त्यांची कामे दोन स्वतंत्र विभाग करीत असल्याने दोन्हींमध्ये समन्वय राहत नाही. त्यामुळे महापालिका आयुक्त नवलकिशोर राम यांनी रस्ते तयार करतानाच ड्रेनेजची कामे व्हावीत, यासाठी पथ विभागाला याची जबाबदारी दिली आहे. त्यामुळे रस्त्यांची कामे दर्जेदार होऊन पाण्याचा निचरा देखील होणार आहे.
महानगरपालिकेच्या पथ विभागामार्फत शहरातील विविध रस्त्यांची कामे केली जातात, तर ड्रेनेज विभागामार्फत पावसाळी वाहिन्या आणि सांडपाणी वाहिन्या टाकल्या जातात. ही दोन्ही कामे करताना दोन्ही विभागांत समन्वय नसतो. परिणामी, पथ विभागाने रस्ता तयार केल्यावर त्यावर ड्रेनेजलाइन टाकण्यासाठी पथ विभागाला परवानगी मागून ड्रेनेजलाइन टाकण्यासाठी तयार केलेले रस्ते पुन्हा खोदले जातात. यामुळे रस्ते नादुरुस्त होऊन त्यावर खड्डे पडतात. याचा त्रास सर्वसामान्य नागरिकांना सहन करावा लागतो. तसेच, पालिकेचा पैसादेखील वाया जातो. यामुळे यापुढे शहरातील कोणतेही रस्ते करताना त्यावर ड्रेनेजलाइन टाकण्याचे काम देखील रस्त्याच्या कामासोबतच केले जाणार आहे. याची सुरुवात महापालिकेत समाविष्ट झालेल्या 32 गावांतील रस्ते तयार करताना केली जाणार आहे, अशी माहिती आयुक्त नवलकिशोर राम यांनी दिली. यासाठी ड्रेनेज टाकण्याच्या कामाची जबाबदारीही आता पथ विभागाकडे राहणार आहे.pun
पावसाळा सुरू होण्यापूर्वी रस्त्यांचे डांबरीकरण, तर काही रस्ते पुन्हा नव्याने तयार केले जातात, तर ड्रेनेज विभाग देखील नवीन ड्रेनेजलाइन टाकणे, जुन्या ड्रेनेजलाइन नव्याने टाकण्याचे काम करीत असतात. वर्षभर ही कामे शहरात सुरू असतात. मात्र, याबाबत पथ आणि ड्रेनेज विभाग यांच्यात समन्वय नसल्याने नव्या रस्त्यावर ड्रेनेजलाइन टाकली जाते. यामुळे पैसा व वेळ दोन्ही वाया जातात. यामुळे ही कामे एकाच विभागाने केल्यास हे टाळता येणार आहे.