Factory Pollution Pudhari
पुणे

Pune RMC Plant Relocation Pollution: पुण्यातील आरएमसी व डांबर प्लांट शहराबाहेर; प्रदूषण रोखण्यासाठी मोठा निर्णय

नियमभंग करणाऱ्यांवर कारवाई; शहराच्या सीमेवर नवीन प्लांट उभारणीचे नियोजन

पुढारी वृत्तसेवा

पुणे: शहरातील वाढत्या वायुप्रदूषणावर नियंत्रण मिळवण्यासाठी खासगी तसेच महापालिकेचे रेडीमिक्स काँक्रीट आणि डांबर (हॉटमिक्स) प्लांट शहराबाहेर हलवणे गरजेचे आहे. महापालिकेच्या प्लांटसह सर्व संबंधित प्रकल्प शहराच्या हद्दीबाहेर स्थलांतरित करण्यासाठी प्रशासनाने तातडीने कारवाई करावी, असे आदेश स्थायी समितीत देण्यात आल्याची माहिती अध्यक्ष श्रीनाथ भिमाले यांनी दिली.

नगरसेवक हरिदास चरवड यांनी वडगाव परिसरात सुरू असलेल्या आरएमसी प्लांटमुळे मोठ्या प्रमाणावर प्रदूषण होत असल्याची बाब स्थायी समितीसमोर मांडली होती. दाट लोकवस्तीच्या भागात सुरू असलेले असे प्लांट तातडीने हलवावेत, असा प्रस्ताव त्यांनी सादर केला होता. यावर गुरुवारी झालेल्या स्थायी समितीच्या बैठकीत सविस्तर चर्चा करण्यात आली.

या चर्चेनंतर प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या नियमांचे उल्लंघन करून सुरू असलेल्या आरएमसी तसेच डांबर प्लांट्‌‍सवर तातडीने कारवाई करण्याचे आदेश प्रशासनाला देण्यात आले आहेत. तसेच शहराच्या सीमेवरील तुलनेने कमी लोकसंख्या असलेल्या भागांमध्ये हे प्रकल्प स्थलांतरित करण्यासाठी खासगी व्यावसायिकांनाही आवाहन करण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले.

डांबर प्लांटही शहराबाहेर हलविण्याचा निर्णय

महापालिकेचा येरवडा येथे सध्या कार्यरत असलेला डांबर प्लांटही शहराबाहेर हलविण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. पुढील काळात शहराच्या चारही बाजूंना स्वतंत्रपणे असे प्लांट उभारण्याचे नियोजन असून, त्यासाठी जागांचा शोध सुरू आहे. शिंदेवाडी जकात नाका आणि वाघोली परिसरात नवीन प्लांट उभारण्यासाठी पुढील सहा महिन्यांत कारवाई करण्याचे निर्देश प्रशासनाला देण्यात आल्याची माहिती श्रीनाथ भिमाले यांनी दिली.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT