वेल्हे : पुणे-पानशेत रस्त्यावर सुरू असलेल्या पुणे बाह्यवळण रिंग रोड प्रकल्पाच्या कामामुळे सिंहगड भागातील रांजणे, खामगाव, कोंडगाव आणि आंबेड या चार गावांचा पाणीपुरवठा गेल्या काही महिन्यांपासून पूर्णपणे खंडित झाला आहे. यामुळे ग््राामस्थांना पिण्याच्या पाण्यासाठी हालअपेष्टा सहन कराव्या लागत आहेत.
रिंग रोडच्या कामामुळे या गावांना पाणीपुरवठा करणाऱ्या जुन्या जलवाहिन्या बाधीत झाल्या आहेत. पानशेत रस्त्यावरील वरदाडे येथे रिंग रोडच्या कामात या जलवाहिन्या उखडल्या गेल्याने अनेक महिन्यांपासून पाणीपुरवठा बंद असल्याने नागरिकांचे अतोनात हाल सुरू आहेत. या भागातील नागरिक हे दुग्ध व्यवसायावर अवलंबून असल्याने वाढत्या उन्हाच्या कडाक्यात जनावरांच्या पिण्याचा पाण्याचा प्रश्नही गंभीर बनला आहे.
पिण्याच्या पाण्याचा प्रश्न सोडवण्यासाठी पर्यायी जलवाहिनी आणि विहीर स्थलांतरासाठी जागा निश्चित करण्यात आली आहे, तसेच निधीही मंजूर झाला आहे. मात्र, प्रत्यक्ष कामाची अंमलबजावणी अद्याप पूर्ण न झाल्याने पाणीपुरवठा सुरू होण्यास विलंब होत आहे.
नवीन पाणीपुरवठा योजना पूर्ण होईपर्यंत संबंधित गावांना तात्पुरत्या स्वरूपात तातडीने पाणीपुरवठा सुरू करावा. जलवाहिनी स्थलांतर आणि नवीन पाणीपुरवठा योजनेचे काम प्राधान्याने आणि ठराविक वेळेत पूर्ण करावे. अशी मागणी आमदार शंकर मांडेकर यांनी रस्ते विकास महामंडळ यांच्याकडे केली आहे.
जिल्हा परिषद सदस्य अमोल नलावडे म्हणाले की, उन्हाचा कडाका वाढल्याने पाण्याची टंचाई मोठ्या प्रमाणात भासत आहे. रस्ते विकास महामंडळाने दखल घेतली नाही तर स्थानिक ग््राामस्थांसह हंडा मोर्चा काढणार असल्याचे सांगितले.