Collector Office Pudhari
पुणे

Pune Resident Deputy Collector: पुण्याच्या निवासी उपजिल्हाधिकारीपदासाठी इच्छुकांची फिल्डिंग! ज्योती कदम यांच्या बदलीनंतर पद रिक्त

अकोला येथे अतिरिक्त जिल्हाधिकारी म्हणून बदली; दिवाळीनंतर नव्या नियुक्तीची शक्यता, महसूल विभागातील अधिकाऱ्यांचे प्रयत्न सुरू

पुढारी वृत्तसेवा

पुणे: पुणे जिल्हाधिकारी कार्यालयातील महत्त्वाच्या निवासी उपजिल्हाधिकारी पदासाठी प्रशासकीय वर्तुळात इच्छुकांची फिल्डिंग सुरू झाली आहे. सध्याच्या निवासी उपजिल्हाधिकारी ज्योती कदम यांची अतिरिक्त जिल्हाधिकारी म्हणून अकोला येथे बदली झाल्याने पुण्यातील हे पद रिक्त झाले आहे. त्यामुळे या पदावर कोणाची वर्णी लागणार, याबाबत प्रशासकीय वर्तुळात उत्सुकता निर्माण झाली आहे.

जिल्हाधिकारी कार्यालयातील निवासी उपजिल्हाधिकारी हे पद अत्यंत महत्त्वाचे मानले जाते. जिल्हाधिकारी कार्यालयातील विविध विभागांमधील समन्वय, महसूल प्रशासनाचे कामकाज, प्रशासकीय निर्णयांची अंमलबजावणी, तसेच विविध शासकीय योजनांचा आढावा घेण्याची महत्त्वाची जबाबदारी या पदावरील अधिकाऱ्यांकडे असते.

जिल्हाधिकारी आणि महसूल प्रशासनातील विविध यंत्रणांमध्ये समन्वय साधण्याचे कामही निवासी उपजिल्हाधिकाऱ्यांना करावे लागते. ज्योती कदम यांच्या बदलीनंतर या पदासाठी इच्छुक अधिकाऱ्यांकडून वरिष्ठ स्तरावर प्रयत्न सुरू झाल्याची चर्चा आहे. पुण्यासारख्या महत्त्वाच्या आणि प्रशासकीयदृष्ट्या संवेदनशील जिल्ह्यात निवासी उपजिल्हाधिकारी म्हणून काम करण्यास अनेक अधिकारी इच्छुक असतात.

त्यामुळे या नियुक्तीसाठी महसूल विभागातील इच्छुक अधिकाऱ्यांनी आपापल्या पातळीवर फिल्डिंग लावण्यास सुरुवात केली आहे. दरम्यान, दिवाळीच्या पार्श्वभूमीवर प्रशासकीय बदल्यांबाबतचा निर्णय काहीसा लांबण्याची शक्यता आहे. दिवाळीनंतर या रिक्त पदावर नव्या अधिकाऱ्याची नियुक्ती होण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.

त्यामुळे पुण्याच्या निवासी उपजिल्हाधिकारीपदी कोणाची नियुक्ती होणार, याकडे जिल्हाधिकारी कार्यालयातील अधिकारी आणि कर्मचाऱ्यांचे लक्ष लागले आहे. नव्या अधिकाऱ्याच्या नियुक्तीनंतर जिल्हाधिकारी कार्यालयातील प्रशासकीय कामकाजाला गती मिळण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT