Maharashtra Rain Forecast Pudhari
पुणे

Pune Rain Update: दिवाळीत पुण्यावर पावसाचे सावट; २४ तासांत ४१.९ मिमी पाऊस, शहरात गारठा वाढला!

चक्रीवादळामुळे बाष्पयुक्त वाऱ्यांचा प्रभाव; १५ ते २० ठिकाणी पाणी साचले, १२ ते १३ ठिकाणी झाडपडीच्या घटना

पुढारी वृत्तसेवा

पुणे: गत २४ तासांत शहरात धो-धो पावसाने हजेरी लावली. रविवारी रात्री ते सोमवारी पहाटेपर्यंत शहरात सरासरी ४१.९ मि.मी. पावसाची नोंद झाली, तर सोमवारी दिवसभरात त्यात आणखी वाढ झाली. ४ नोव्हेंबरपर्यंत असेच पावसाळी वातावरण राहणार असून, हलका ते मध्यम पावसाचा अंदाज वर्तविण्यात आला आहे. बंगालच्या उपसागरात तयार झालेल्या 'मुरासू' या चक्रीवादळामुळे शहर आणि परिसरात बाष्पयुक्त वारे प्रचंड वेगाने आले आहे. त्यामुळे शहराची आर्द्रता ३० टक्यांवरून तब्बल ८० ते १०० टक्क्यांवर गेली आहे. त्यामुळे ऐन दिवाळीत पावसाळी वातावरण तयार झाले आहे. शहरात कमालीचा गारवा तयार झाला असून, किमान तापमानात मोठी घट झाली आहे.

पावसाने धरली रात्रीची वेळ

शनिवारपासून पावसाने रात्रीची वेळ धरली आहे. मध्यरात्री ते पहाटे पाऊस पडत आहे. रविवारी सायंकाळी हलका पाऊस बरसला. त्यानंतर मध्यरात्री मुसळधार पावसामुळे पुणेकर जागे झाले. पहाटेपर्यंत धो-धो पाऊस सुरू असल्याने लहान मुलांसह पालकांची शाळेकडे जाताना तारांबळ उडाली. रेनकोट, छत्री घेऊनच बाहेर पडावे लागले. सोमवारी सकाळी ८ वाजेपर्यंत पाऊस सुरूच होता, तर दिवसभर आकाश दाट धुक्याने भरून गेले होते. अशाच वातावरणात पुणेकरांनी दिवाळीची खरेदी केली. पथारी विक्रेत्यांना मात्र पावसामुळे छत्री, ताडपत्रीचा आधार घ्यावा लागला.

उंच इमारती हरवल्या दाट धुक्यात

सोमवारी पहाटे आकाश चहूबाजूंनी काळ्या ढगांनी वेढलेले दिसले. त्यातच दाट धुके अगदी जमिनीवर आलेले असल्याने दृश्यमानता सकाळी ८ पर्यंत कमी झाली होती. शहरातील उंच इमारती दाट धुक्यात हरवलेल्या दिसत होत्या. असे वातावरण जुलै किंवा ऑगस्ट महिन्यात पाहावयास मिळते. यंदा ते नोव्हेंबरमध्ये दिसले. शहराची आर्द्रता ३० टक्क्यांवरून १०० टक्क्यांवर गेली तसेच तापमानाचा पारा खाली आल्याने गारठा जाणवत आहे.

कमाल-किमान तापमानात ३ अंशांचा फरक

शहराची आर्द्रता ९८ ते १०० टक्क्यांवर गेल्याने कमाल तापमानाचा पारा ३४ ते ३५ अंशांवरून २४ अंशांवर खाली आला. कमाल तापमानात १० अंशांनी घट झाली, तर किमान तापमान सरासरी २१ अंशांपर्यंत उतरले. कमाल आणि किमान तापमानात यंदा प्रथमच चक्क ३ अंशांचे अंतर पाहावयास मिळाले.

शहरात १५ ते २० ठिकाणी साचले पाणी

आपत्कालीन विभागाकडे ३५ तक्रारी १२ ते १३ ठिकाणी झाडपडीच्या घटना

गेल्या दोन दिवसांपासून रात्री आणि पहाटेच्या सुमारास होत असलेल्या मुसळधार पावसामुळे शहरातील विविध भागांत पाणी साचण्याच्या घटना घडल्या आहेत. पाणी साचल्याबाबत महापालिकेच्या आपत्कालीन विभागाकडे ३५ तक्रारी प्राप्त झाल्या. त्यापैकी १५ ते २० ठिकाणी पाणी साचल्याचे समोर आले आहे. याशिवाय, शहरात १२ ते १३ ठिकाणी झाडपडीच्या घटना घडल्या आहेत. सुदैवाने या घटनांमध्ये कोणतीही जीवितहानी झाली नसल्याची माहिती महापालिकेच्या आपत्कालीन विभागप्रमुख गणेश सोनुने यांनी दिली. शहराच्या विविध भागांत कमी-अधिक प्रमाणात पावसाची नोंद झाली. पहाटेच्या सुमारास पावसाचा जोर वाढल्याने कात्रज, आंबेगाव, व्हीआयटी कॉलेज परिसर, उंड्री तसेच नगर रस्त्यावरील तरवडेवस्तीसह अन्य काही भागांत पाणी साचले. त्यामुळे नागरिकांना काही काळ अडचणींचा सामना करावा लागला.

पावसाळी जाळ्यांमध्ये कचरा अडकल्याने पाण्याचा निचरा होण्यास अडथळा निर्माण झाला होता. परिणामी, रस्त्यांवर पाणी साचल्याच्या तक्रारी मोठ्या प्रमाणावर प्राप्त झाल्या. संबंधित क्षेत्रीय कार्यालयांतील आपत्ती व्यवस्थापन कक्षाशी समन्वय साधून या तक्रारींचे निराकरण करण्यात आले. पाण्याचा निचरा व्यवस्थित होत नसल्यामुळेच बहुतांश ठिकाणी पाणी साचल्याचे निदर्शनास आले. दरम्यान, पहाटे झालेल्या जोरदार पावसामुळे कोथरूड, कात्रजसह शहरातील अन्य भागांत १२ ते १३ ठिकाणी झाडपडीच्या घटना घडल्या. महापालिकेच्या संबंधित यंत्रणांनी या घटनांची दखल घेतली. या सर्व घटनांमध्ये कोणतीही जीवितहानी झाली नसल्याचेही सोनुने यांनी स्पष्ट केले.

शहरात २४ तासांत झालेला पाऊस

शिवाजीनगर ४१.१, आंबेगाव ४९.५, लोहगाव ३६.२, हडपसर ३५.५, मगरपट्टा ३०.५, चिंचवड १९.५, पाषाण १४.६, खडकवासला ७, एनडीए ५.५

सोमवारी दिवसभरात झालेला पाऊस

शिवाजीनगर १०.७, लोहगाव २७, चिंचवड ११.५, मगरपट्टा १६, एनडीए ७

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT