Pune Rain Sinhagad Road Traffic Update
पुणे : पुणे शहरात आज (दि. १९) सगळीकडे संततधार सुरू आहे. सकाळच्या ऑफिस व शाळेच्या वेळेत वाहतूक कोंडीमुळे नागरिकांना प्रचंड मनस्ताप सहन करावा लागत आहे. सिंहगड रस्ता आणि पुण्याच्या मध्यवर्ती भागातही मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी होत आहे. सलग संततधारेमुळे धरणांमधील पाणीपातळी झपाट्याने वाढत असून खडकवासला व पानशेत धरणातून विसर्ग वाढवण्यात आला आहे. (pune rain)
सिंहगड रस्त्यावर असलेल्या विठ्ठलवाडी परिसरात मोठ्या प्रमाणावर वाहतूक कोंडी होत आहे. सिंहगड रस्त्यावर वाहनांच्या लांबच लांब रांगा लागत आहेत. सिंहगड रोडवरील नव्याने उभारण्यात आलेल्या उड्डाणपूलाचे लोकार्पण न झाल्यामुळे इतर रस्त्यांवर वाहतुकीचा ताण येत आहे. मुसळधार पाऊस आणि वाहतूक कोंडी यामुळे पुणेकर अक्षरशः वैतागले आहेत. याशिवाय कॕनाॕल रस्ताआणि पुणे मध्यवर्ती भागातही वाहतूक कोंडी झाली आहे.
खडकवासला धरणातून सकाळी ११ वाजता ४१७० क्युसेकवरून विसर्ग वाढवून ७५६१ क्युसेक करण्यात आला. त्याचप्रमाणे पानशेत धरणातून सकाळी ११ वाजता नदीपात्रात सुरू असलेला ३९९६ क्युसेक विसर्ग वाढवून सांडव्याद्वारे ५९०८ क्युसेक आणि विद्युत निर्मिती केंद्राद्वारे ६०० क्युसेक, मिळून एकूण ६५०८ क्युसेक पाणी सोडण्यात आले आहे. आवश्यकतेनुसार हा विसर्ग वाढवला किंवा कमी केला जाऊ शकतो, अशी माहिती उपविभागीय अभियंता मोहन शांताराम भदाणे यांनी दिली.