पुणे: पुणे रेल्वे स्थानकावर दिवसेंदिवस भार वाढत आहे. परिणामी, प्रवाशांना बहुतांश पायाभूत सुविधा मिळेनाशा झाल्या आहेत. बसायला जागा नाही, मोफत पिण्याचे पाणी नाही, सर्वत्र अस्वच्छता आहे, अनधिकृत विक्रेत्यांसह चोरट्यांचा स्थानकात सहजपणे चारही बाजूने प्रवेश आहे, त्यावर उपाय म्हणजे आता पुणे रेल्वे स्थानकाचा पुनर्विकास होणे गरजेचे आहे, हाच पुनर्विकास कधी होणार? असा सवाल रेल्वे प्रवासी आणि रेल्वे संघटनांकडून केला जात आहे.
दरम्यान, पुण्यात पुणे रेल्वे स्थानकावर आल्यावर रेल्वेमंत्र्यांनी पुनर्विकासाचा डीपीआर तयार असल्याचे सांगितले होते, हाच डीपीआर (प्रकल्प अहवाल) लवकरात लवकर प्रसिद्ध करावा आणि रेल्वे प्रवासी तज्ज्ञांच्या सूचना घ्याव्यात, अशी मागणी त्यांच्याकडून होत आहे. (Latest Pune News)
पुणे विभागातील अधिकाऱ्यांना डीपीआरबाबत माहिती मिळेना
पुणे रेल्वे स्थानकाच्या पुनर्विकासासंदर्भात डीपीआर तयार असल्याची माहिती रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांनी पुणे रेल्वे स्थानकावर आल्यावर पत्रकारांशी बोलताना दिली. त्याला आता बरेच महिने झाले आहेत. या डीपीआर (प्रकल्प अहवाल) संदर्भातील माहिती दै. ‘पुढारी’च्या प्रतिनिधीने पुणे विभागातील वरिष्ठ रेल्वे अधिकाऱ्यांना अनेकदा मागितली. मात्र, ती माहिती मिळत नाही, असे उत्तर मिळाले.
रेल्वेमंत्र्यांनीच जर डीपीआर पूर्ण असल्याचे सांगितले आहे अन् पुणे रेल्वे स्थानकाचा पुनर्विकास होणार आहे तर मग पुणे रेल्वे प्रशासन डीपीआरमधील माहिती कोणाच्या भीतीने लपवत आहे, ती जनमाणसांत प्रसिद्ध करून, त्यावर प्रवासी तज्ञांच्या सूचना घेणे बंधनकारक आहे, असे असताना रेल्वे पुणे विभाग प्रशासनाकडून याबाबतची माहिती जनमाणसांत प्रसिद्ध केली जात नाही. त्यामुळे पुणे रेल्वे प्रशासन पुणे रेल्वे स्थानकाचा पुनर्विकास करताना प्रवासी तज्ज्ञांच्या सूचना विचारात घेणार की नाही? असा प्रश्न प्रवासी तज्ज्ञांनी विचारला आहे.
रेल्वे प्रशासनाने प्रवाशांची सोय पाहायची तर रेल्वे अधिकाऱ्यांची सोय बघत आहे. रेल्वे स्थानकाशेजारी अधिकाऱ्यांसाठी संगम पार्क वसविले. भविष्याचा विचार केला की नाही. भविष्यात बुलेट ट्रेन, हायपर लूप, सायबर ट्रेन धावायला लागतील. त्यांच्यासाठी रेल्वे जागा कोठून आणणार? पुणे रेल्वे स्थानकासह संगम पार्क, मालधक्का जागेला धरून आणि भविष्याचा विचार करून एकदाच पुणे रेल्वे स्थानकाचा भव्य डीपीआर करा आणि लवकरात लवकर आंतरराष्ट्रीय दर्जाप्रमाणे पुणे रेल्वे स्थानकाचा विकास करा. रेल्वेमंत्र्यांनी नुसती घोषणाबाजी करू नये, पुनर्विकासाचे काम प्रत्यक्षात आणावे आणि डीपीआर प्रसिद्ध करावा, त्याबाबत तज्ज्ञांच्या काही सूचना असतील, तर त्यांचा विचार व्हावा.- हर्षा शहा, अध्यक्षा, रेल्वे प्रवासी ग्रुप
रेल्वेमंत्र्यांनी पुण्यात पुणे रेल्वे स्थानकावर आल्यावर पुणे रेल्वे स्थानकाचा विकास करणार आणि त्याचा डीपीआर तयार असल्याची घोषणा केली होती, त्याचे काय झाले? सध्या पुणे रेल्वे स्थानकाचा पुनर्विकास लवकरात लवकर होणे गरजेचे आहे. रेल्वे स्थानकावर प्रवाशांचा भार वाढत आहे. प्रवाशांना बसायला जागा राहिलेली नाही. विकेंड, सणासुदीला प्रचंड गर्दी होत आहे. याबाबत माहिती घेण्यासाठी दोन दिवसांत पुणे विभागातील प्रमुख डीआरएम यांची भेट घेणार आहे. तसेच, डीपीआर जनमाणसांत प्रसिद्ध करण्यासंदर्भात त्यांच्याशी चर्चा करणार आहे.- आनंद सप्तर्षी, सदस्य, प्रादेशिक सल्लागार समिती, मध्य रेल्वे