पुणे: राज्य शासनाने नुकतेच सर्व महापालिकांना सुसज्ज पशुवैद्यकीय दवाखाने उभारण्याच्या सूचना दिल्या आहेत. प्राणिसंवर्धन विभागाच्या 100 दिवसांच्या कृतिआराखड्याचा आढावा घेताना शहरी भागातील वाढत्या भटक्या प्राण्यांच्या संख्येची नोंद घेण्यात आली होती आणि उत्तम पशुवैद्यकीय सुविधा उपलब्ध करून देण्याची गरज मुख्यमंत्र्यांनी काही दिवसांपूर्वी व्यक्त केली होती. त्या पार्श्वभूमीवर या सूचना देण्यात आल्या आहेत.
शासनाने जारी केलेल्या परिपत्रकानुसार महापालिका आयुक्तांवर रुग्णालयांचे नियोजन व उभारणीची जबाबदारी असेल. महाराष्ट्र महानगरपालिका अधिनियम, 1949 नुसार, कलम 66 (23) मध्ये महापालिकांना प्राण्यांसाठी रुग्णालये उभारण्याची अथवा चालविण्याची तरतूद आहे, असे शहरी विकास विभागाचे सचिव अनिलकुमार उगले यांनी सही केलेल्या आदेशात म्हटले आहे. (Latest Pune News)
पुणे महापालिकेचा सप्टेंबर 2022 मध्ये हडपसर येथे खासगी संस्थेच्या भागीदारीने पशुवैद्यकीय रुग्णालय उभारण्याचा प्रस्ताव होता. रहिवासी आणि लोकप्रतिनिधींच्या विरोधामुळे तो मंजूर होऊ शकला नाही. महापालिकेने आता भुजबळवाडी येथे 10,000 चौरस फूट क्षेत्रफळाची जागा पशुवैद्यकीय रुग्णालयासाठी निश्चित केल्याचे समजते. शहरात प्राण्यांच्या आरोग्याच्या गरजा पूर्ण करण्यासाठी सुसज्ज रुग्णालयाची आवश्यकता आहे, असे पशुवैद्यकीय अधिकारी डॉ. सारिका फुंदे-भोसले यांनी सांगितले.