Pune Railway Station Redevelopment Pudhari
पुणे

Pune Railway Station Redevelopment: पुणे रेल्वेस्थानकावर विमानतळासारखा ‘होल्डिंग एरिया’; 398 कोटींच्या पुनर्विकासाला वेग

नवी दिल्लीच्या धर्तीवर अत्याधुनिक प्रतीक्षा क्षेत्र, स्कॅनर्स, फूड कोर्ट आणि डिजिटल सुविधा उभारणार

पुढारी वृत्तसेवा

प्रसाद जगताप

पुणे: पुणे रेल्वे स्थानकाचा 398 कोटी रुपयांचा पुनर्विकास प्रकल्प आता निर्णायक टप्प्यावर पोहोचला असून, प्रवाशांना लवकरच विमानतळाच्या धर्तीवर जागतिक दर्जाच्या येथे सुविधा मिळणार आहेत. गर्दीच्या व्यवस्थापनासाठी नवी दिल्ली रेल्वे स्थानकाच्या धर्तीवर पुण्यातही एक भव्य होल्डिंग एरिया (प्रतीक्षा क्षेत्र) विकसित करण्यात येणार आहे. यामुळे प्रवाशांचा प्रवास अधिक सुखकर आणि सुरक्षित होणार आहे.

प्रतीक्षालये आणि सुरक्षा यंत्रणा होणार हायटेक

रेल्वेस्थानकाच्या पुनर्विकासात प्रवाशांच्या सोयीसाठी अत्याधुनिक कॉन्कोर्स बांधला जाणार आहे. यामध्ये प्रवाशांसाठी प्रशस्त प्रतीक्षालये, फूड कोर्ट आणि रिटेल आऊटलेट्‌‍स असतील. विशेष म्हणजे, विमानतळाप्रमाणे सुरक्षा तपासणीसाठी आधुनिक स्कॅनर्स मशीन आणि तिकीट वितरणासाठी डिजिटल व्यवस्था कार्यान्वित केली जाईल. प्लॅटफॉर्मवर होणारी गर्दी कमी करण्यासाठी एन्ट्री आणि एक्झिट गेट्‌‍स पूर्णपणे वेगळे ठेवण्यात येणार आहेत. हा अत्याधुनिक होल्डींग एरिया येथील एसटी बसस्थानकाशेजारी उभारण्यात येणार आहे, असे रेल्वेच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी दै. ‌’पुढारी‌’च्या प्रतिनिधीशी बोलताना सांगितले.

पुनर्विकासाचा वेग वाढला

स्थानकाचा पुनर्विकास करताना ऐतिहासिक वास्तूला धक्का न लावता पुनर्विकासाच्या कामाला सुरुवात होत आहे. जुन्या इमारतींचे पाडकाम आणि यार्ड रिमॉडलिंगचे काम युद्धपातळीवर सुरू आहे. त्यात नवीन सहा प्लॅटफॉर्म उभारण्याच्या कामालाही सुरुवात झाली आहे.

रेल्वे स्थानकाचा होल्डिंग एरिया नेमका कसा असेल

  • प्रवाशांना प्लॅटफॉर्मवर गर्दी न करता बसण्यासाठी भव्य क्षेत्र

  • प्रत्येक ट्रेनचे लोकेशन आणि वेळेची माहिती देणारे महाकाय एलईडी स्क्रीन्स

  • सुरक्षा तपासणीसाठी स्कॅनर्स मशीन

  • तिकीट रांगा नियंत्रित करण्यासाठी लोखंडी बॅरिकेडद्वारे भव्य व्यवस्था

  • आंतरराष्ट्रीय बँड्‌‍सचे फूड कोर्ट आणि प्रवासासाठी आवश्यक वस्तूंची दुकाने

  • स्थानकातून बाहेर पडण्यासाठी सरकते जिने आणि ट्रॅव्हेलेटर

पुणे रेल्वेस्थानकाच्या पुनर्विकासाचे काम तातडीने करणे, हे आमचे उद्दिष्ट आहे. पुनर्विकासाच्या कामाचाच भाग म्हणजे नवी दिल्लीतील होल्डिंग एरियाप्रमाणेच पुणे रेल्वेस्थानक परिसरात होल्डिंग एरिया उभारण्यात येणार आहे. यात प्रवाशांना रेल्वे येईपर्यंत सर्व सोयींनी युक्त अशा या भव्य क्षेत्रात थांबता येईल. सुरक्षा आणि आधुनिकता यावर आमचा विशेष भर आहे.
हेमंत कुमार बेहेरा, जनसंपर्क अधिकारी, मध्य रेल्वे, पुणे विभाग

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT