Pune railway facilities upgrade
पुणे : पुणे रेल्वे स्थानकावर प्रवाशांच्या सोयीसाठी आणि त्यांना अधिक सुलभ प्रवास मिळावा, या हेतूने दोन नवीन लिफ्ट आणि पिण्याच्या पाण्याचा एक कूलर प्रवाशांच्या सेवेत रुजू करण्यात आले आहेत. केंद्रीय नागरी उड्डाण वाहतूक आणि सहकार राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांच्या हस्ते मंगळवारी (दि.10) रोजी या नवीन सुविधांचे लोकार्पण करण्यात आले. 'दैनिक पुढारी'ने या लिफ्ट संदर्भात केलेल्या पाठपुराव्याला अखेर यश आले आहे. त्यामुळे ज्येष्ठ नागरिक, दिव्यांग प्रवाशांकडून समाधान व्यक्त होत आहे.
पुणे रेल्वे स्थानकावरील प्लॅटफॉर्म क्रमांक ६ च्या सर्क्युलेटिंग एरियामध्ये आणि प्लॅटफॉर्म क्रमांक १ वर प्रत्येकी एक नवीन लिफ्ट बसवण्यात आली आहे. या लिफ्टमुळे ज्येष्ठ नागरिक, दिव्यांग प्रवासी आणि महिला प्रवाशांना प्लॅटफॉर्मवर ये-जा करणे अधिक सोपे होणार आहे. यासोबतच, प्लॅटफॉर्म क्रमांक १ वर एक नवीन पिण्याच्या पाण्याचा कूलरही बसवण्यात आला आहे. यामुळे प्रवाशांना शुद्ध आणि थंड पाणी उपलब्ध होईल.
या लोकार्पण सोहळ्याला पुणे विभागाचे विभागीय रेल्वे व्यवस्थापक राजेश कुमार वर्मा, अपर रेल्वे व्यवस्थापक पद्मसिंह जाधव, वरिष्ठ वाणिज्य व्यवस्थापक अनिल कुमार पाठक, वरिष्ठ विद्युत अभियंता पराग आकणूरवार आणि इतर अनेक विभागीय अधिकारी उपस्थित होते.