पुणे: पुणे रेल्वे स्टेशन परिसरात 17 फेबुवारी रोजी एका 4 वर्षीय मुलीचे अपहरण करून तिच्यावर झालेल्या अत्याचाराची गंभीर दखल राज्य महिला आयोगाकडून घेण्यात आली असून, आयोगाच्या अध्यक्षा रूपाली चाकणकर यांनी रेल्वे प्रशासनासोबत तातडीची बैठक घेत, येथील सुरक्षा व्यवस्था आणि गस्तीवरील पोलिस पथके वाढवण्याचे आदेश दिले आहेत.
पुणे रेल्वे स्टेशनवर घडलेल्या या घटनेच्या पार्श्वभूमीवर राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रूपाली चाकणकर यांनी बुधवारी (दि.25) रेल्वे प्रशासनाची लोहमार्ग पोलिस अधीक्षक कार्यालयात तातडीची बैठक घेतली. पुणे शहर सुरक्षित ठेवणे, ही आपली सर्वांची जबाबदारी असून, अशा घटनांची पुनरावृत्ती होऊ नये, यासाठी कडक उपाय योजनेच्या सूचना त्यांनी केल्या. चाकणकर म्हणाल्या, की या घटनेतील पीडित मुलगी आणि तिचा परिवार मूळचा मध्य प्रदेशचा आहे. याप्रकरणी पोलिसांनी तातडीने कारवाई करीत आरोपीला अटक केली आहे.
बाहेरून आतमध्ये येणाऱ्या व विनाकारण फिरणाऱ्या टवाळखोरांना रेल्वे स्टेशन परिसरात प्रवेश दिला जाऊ नये. रेल्वे पोलिसांनी स्टेशन परिसरातील सुरक्षा वाढवण्यासाठी अतिरिक्त मनुष्यबळाचा प्रस्ताव पाठवला आहे. स्टेशनच्या कानाकोपऱ्यात गस्त वाढवण्याच्या सूचनाही त्यांनी या वेळी दिल्या. त्या पुढे म्हणाल्या, की रोहित पवार यांनी उपस्थित केलेल्या प्रश्नांची आणि लोकांच्या मनातील संशयाची उत्तरे सखोल चौकशीतून मिळावीत, अशी मागणीही त्यांनी या वेळी केली.