पुणे: पुणे शहरातील रेल्वेप्रवाशांची वाढती संख्या आणि स्थानकावरील ताण लक्षात घेता रेल्वे प्रशासनाने पुणे गर्दीनिवारण योजनेला मोठी गती दिली आहे. या योजनेंतर्गत हडपसर आणि खडकी या दोन महत्त्वाच्या उपनगरीय स्थानकांच्या विकासासाठी अतिरिक्त निधीला मंजुरी दिली आहे. विशेषतः हडपसर रेल्वेस्थानकावर चौथा प्लॅटफॉर्म आणि नवीन पादचारी पुलासाठी 26 कोटी रुपये, तर खडकी टर्मिनलच्या स्थानक इमारत आणि प्रवासी सुविधांसाठी 70 कोटींच्या अतिरिक्त कामांना मंजुरी मिळाली आहे.
हडपसर टर्मिनलवर प्रवाशांसाठी दुसरे नवे प्रवेशद्वार होणार
हडपसर स्थानकाचा विस्तार 153 कोटी रुपये खर्चून आधीच केला जात आहे. यामध्ये यार्डची क्षमता 7 मार्गिकांपर्यंत वाढविणे आणि फलाटांची लांबी वाढविणे, यांसारखी महत्त्वपूर्ण कामे प्रगतिपथावर आहेत. आता मंजूर झालेल्या अतिरिक्त 26 कोटींमुळे तिथे चौथ्या फलाटाची (प्लॅटफॉर्म) निर्मिती केली जाणार आहे. यामुळे हडपसर येथून अधिक गाड्या सोडणे शक्य होणार आहे. तसेच, सर्व फलाटांना जोडणारा दुसरा प्रवेशद्वार विकसित केल्यामुळे प्रवाशांना स्थानकात येणे आणि बाहेर जाणे अधिक सोयीचे होणार आहे, असे रेल्वेच्या पुणे विभागाचे विभागीय रेल्वे व्यवस्थापक राजेशकुमार वर्मा यांनी सांगितले.
खडकी टर्मिनलचा आता आधुनिकीकरणाचा नवा टप्पा
खडकी रेल्वेस्थानकाचेही मोठ्या प्रमाणावर आधुनिकीकरण केले जात आहे. 50 कोटी रुपये खर्चून यार्डचा विस्तार 8 मार्गिकांपर्यंत करण्यात आला असून, फलाटांची (प्लॅटफॉर्म) संख्या 3 वरून 4 केली आहे. आता अतिरिक्त 70 कोटींच्या निधीतून स्थानकाची नवीन भव्य इमारत, अत्याधुनिक पादचारी पूल आणि प्रवाशांसाठी प्रतीक्षालय व इतर सुविधांचे जाळे उभारले जाणार आहे. या विकासकामामुळे खडकी रेल्वे टर्मिनल हे पुण्यातील एक प्रमुख रेल्वे हब म्हणून भविष्यात उदयास येणार आहे.
पुणे रेल्वेस्थानकावरील प्रवाशांची गर्दी विभागण्यासाठी हडपसर आणि खडकी टर्मिनलचा विकास करणे, ही काळाची गरज आहे. आम्हाला प्राप्त झालेला अतिरिक्त 96 कोटींचा निधी प्रवाशांना जागतिक दर्जाच्या सुविधा देण्यासाठी आणि रेल्वेचे परिचालन अधिक सुरळीत करण्यासाठी वापरला जाईल. नवीन प्लॅटफॉर्म, पादचारी पूल आणि आधुनिक इमारतींमुळे प्रवाशांचा वेळ वाचेल आणि त्यांचा प्रवासाचा अनुभव अधिक सुखद होईल.राजेशकुमार वर्मा, विभागीय रेल्वे व्यवस्थापक, पुणे विभाग, मध्य रेल्वे