प्रसाद जगताप
पुणे: मध्य रेल्वेचा पुणे विभाग बॉलीवूडसाठी एक नवीन ”पॉवर हाऊस” म्हणून उदयास आला असून, गेल्या तीन वर्षांत चित्रपट चित्रीकरणातून रेल्वेच्या तिजोरीत कोट्यवधींचा महसूल जमा झाला आहे. गेल्या 3 वर्षांत 30 हून अधिक चित्रपट आणि मालिकांच्या शूटिंगमधून मध्य रेल्वेने एकूण 2.29 कोटी रुपयांचा महसूल मिळवला आहे.
मध्य रेल्वेवरील ऐतिहासिक स्थानके, निसर्गरम्य घाट आणि ग््राामीण पार्श्वभूमी आता फक्त प्रवाशांनाच नाही, तर चित्रपट निर्मात्यांनाही भुरळ घालत आहेत. निसर्गरम्य घाट, वारसा वास्तुकला आणि रेल्वेने उपलब्ध करून दिलेल्या सोयींमुळे चित्रपट निर्मात्यांसाठी मध्य रेल्वेचा पुणे विभाग आता पसंतीचे केंद्र बनला आहे.
परवानगीसाठी एक खिडकी योजना
या प्रक्रियेबाबत अधिक माहिती देताना मध्य रेल्वेचे मुख्य जनसंपर्क अधिकारी डॉ. स्वप्नील निला म्हणाले की, बॉलीवूड चित्रपटांच्या शूटिंगमुळे गेल्या तीन वर्षांत आम्हाला 2.29 कोटी रुपयांचे उत्पन्न प्राप्त झाले आहे. या शूटिंगसाठी परवानगी देण्यासाठी आम्ही मध्य रेल्वेच्या मुख्य जनसंपर्क अधिकारी (सीपीआरओ) विभागात ‘एक खिडकी योजना’ सुरू केली आहे. या परमिशनसाठी साधारणपणे 8 ते 10 दिवसांचा कालावधी लागतो.
अशी मिळते परवानगी
चित्रीकरणासाठी परवानगी देताना काही तांत्रिक बाबींची पूर्तता करावी लागते. डॉ. निला यांनी स्पष्ट केले की, शूटिंगसाठी काही शुल्क आकारले जाते. परवानगी देण्यापूर्वी शूटिंगचा कालावधी, आवश्यक स्टेशन, आणि जर रेल्वे गाडीची गरज असेल तर तिचे किती डबे हवेत व ते कोणत्या प्रकारचे असावेत, या सर्व बाबी तपासूनच रीतसर परवानगी दिली जाते, अन त्यानुसार शुल्क आकारले जाते.
पुणे विभागातील हिट लोकेशन्स...
सुपरस्टार रजनीकांत यांचा ‘रोबोट’, अभिषेक बच्चन यांचा ‘रावण’ आणि करीना कपूर यांचा ‘जब वी मेट’ यांसारख्या चित्रपटांचे चित्रीकरण पुणे व लोणावळा रेल्वेस्थानक येथे झाले आहे. अलीकडील हिट चित्रपट ‘लापता लेडीज’चे चित्रीकरण पुणे विभागातील बेलापूर, येवला आणि कान्हेगाव स्थानकांवर झाले. सातारा जिल्ह्यातील वाठार स्थानकाने ‘गुंडे’सारख्या चित्रपटांना एक अनोखा ‘व्हिंटेज’ लूक मिळवून दिला आहे.