Pune Public Toilets Cleanliness Problem Pudhari
पुणे

Pune Public Toilets Cleanliness Problem: ‘स्वच्छ पुणे’चा दावा फोल? सार्वजनिक स्वच्छतागृहांची दुरवस्था; दुर्गंधी, घाण आणि अस्वच्छतेने नागरिक त्रस्त

शहरातील ६२८ स्वच्छतागृहांपैकी अनेक ठिकाणी पाणी, स्वच्छता आणि देखभालीचा अभाव; २४ स्वच्छतागृहे नादुरुस्त

पुढारी वृत्तसेवा

पुणे: देशातील सर्वांत सुंदर आणि राहण्यालायक शहर म्हणून पुण्याची ख्याती आहे. मात्र, महापालिकेच्या अखत्यारीत येणाऱ्या सार्वजनिक स्वच्छतागृहांची (मुताऱ्यांची) अवस्था पाहिली तर उलटी झाल्याशिवाय राहणार नाही; इतकी घाण, अस्वच्छ आणि दुर्गंधीसह संसर्गजन्य रोग पसरवणारी आहेत. गल्लीबोळात मुताऱ्या आहेत आणि कर्मचारी त्या स्वच्छही करीत असतील; मात्र त्या निर्जंतुक होत नाहीत, हे तेथे गेल्यावरच कळते. त्यामुळे पुणेकर नाक दाबून या मुताऱ्यांचा नाइलाजाने वापर करताना दिसतात. महापालिकेसाठी ही अत्यंत शरमेची बाब आहे. दै. ‘पुढारी’ने याबाबत शहरातील विविध भागांतील स्वच्छतागृहांचे सर्वेक्षण केले. त्यातून हे भयंकर वास्तव समोर आले आहे. त्याचा हा आँखो देखा हाल.

गेल्या वीस वर्षांत शहराची लोकसंख्या आणि क्षेत्रफळ वाढले तसे आटोपशीर आणि नीटनेटके पुणे गलिच्छ अन्‌ गचाळ झाले. जुन्या पुणेकरांना हेच का ते माझे सुंदर आणि स्वच्छ पुणे? असा प्रश्न पडल्याशिवाय राहत नाही. ठिकठिकाणच्या मुताऱ्यांतून येणारी भयंकर दुर्गंधी संसर्गजन्य रोगाला आमंत्रण देणारीच आहे. प्रामुख्याने महिलावर्गाला मोठ्या प्रमाणावर स्वच्छतागृहेच उपलब्ध नाहीत. जी आहेत ती गलिच्छ असल्याने त्या तेथे जाऊ शकत नाहीत. नाइलाजाने गेल्याच तर त्यांना मोठ्या प्रमाणावर युरिन इन्फेक्शनचा धोका संभवतो. मुंबईत याबाबत ‘राईट टू पी’ नावाची संघटना महिलांच्या सार्वजनिक मुताऱ्यांबाबत सतत आवाज उठवते; मात्र पुण्यात अशी कोणतीही संघटना नाही, जी महापालिकेला जाब विचारू शकेल. त्यामुळे येथील सार्वजनिक मुताऱ्यांच्या दुर्धर अवस्थेकडे लक्षच नाही.

प्रकाशव्यवस्था नाही; पाणी, स्वच्छतेचा अभाव

पुणे-सातारा रस्त्यावरील पर्वती इंडस्ट्रिअल इस्टेट परिसरातील सार्वजनिक मुतारीमध्ये अत्यंत अरुंद पद्धतीने कडप्पे बसविण्यात आल्याने तेथे उभे राहूनही सुविधा वापरणे कठीण होत आहे. त्यामुळे नागरिकांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे. मार्केट यार्ड आणि मंडई परिसरातील बहुतांश सार्वजनिक मुताऱ्यांमध्ये पाणीपुरवठा आणि प्रकाशव्यवस्था नसल्याचे दिसून येते. परिणामी, अस्वच्छ वातावरणात नागरिकांना सुविधा वापराव्या लागत असून, दुर्गंधी आणि अस्वच्छतेमुळे आरोग्याचा प्रश्नही निर्माण झाला आहे.

चिंचेची तालीम परिसरातील सार्वजनिक मुतारीमध्ये पावसाळ्यात छत गळत असल्याने भर पावसात नागरिकांना त्याच परिस्थितीत सुविधा वापरावी लागते, तर शुक्रवार पेठेतील मामलेदार कचेरी परिसरातील मुतारीमध्ये कडप्पे मोडलेल्या अवस्थेत असून, तेथेही प्रकाशव्यवस्था नसल्याचे चित्र आहे. अनेक ठिकाणी मुताऱ्यांमधील भांडी गायब आहेत, तर काही ठिकाणी ती मोडकळीस आली आहेत. पाण्याची उपलब्धता नसल्याने स्वच्छता राखणे अशक्य होत असून, अस्वच्छतेचा नागरिकांना रोज सामना करावा लागत आहे. विशेष म्हणजे, अनेक सार्वजनिक मुताऱ्यांमध्ये जुनाट व जीर्ण झालेली उपकरणे बदलण्याची गरज असतानाही ती बदलण्याऐवजी केवळ रंगरंगोटी करून नवीन असल्याचा आभास निर्माण करण्याचा प्रयत्न करण्यात आल्याचे रंगकामावरून स्पष्ट होत आहे. एकूणच, मार्केट यार्ड आणि मंडई परिसरातील सार्वजनिक स्वच्छतागृह आणि मुताऱ्यांची दुरवस्था ही पुणे महापालिकेच्या स्वच्छताव्यवस्थेवर प्रश्नचिन्ह निर्माण करणारी असून, नागरिकांकडून तातडीने दुरुस्ती आणि देखभालीची मागणी केली जात आहे.

नागरिकांच्या प्रमुख मागण्या...

  • सार्वजनिक मुताऱ्यांची दिवसातून अनेकवेळा स्वच्छता करावी

  • दुर्गंधी रोखण्यासाठी नियमित निर्जंतुकीकरण करावे

  • पिण्याचे व वापरासाठीचे पाणी सातत्याने उपलब्ध ठेवावे

  • महिलांसाठी स्वतंत्र व स्वच्छ सुविधा उभाराव्यात

  • देखभालीसाठी कायमस्वरूपी कर्मचारी नियुक्त करावेत

  • तक्रारींसाठी हेल्पलाइन व सूचनाफलक लावावेत

आत इतकी घाण की उलटीच होईल!

तळजाई टेकडीपासून ते पर्वती पायथा आणि सारसबागेच्या परिसरापर्यंतच्या भागातील स्वच्छतागृहांची अवस्था अत्यंत वाईट आहे. या भागात अतिशय दाट लोकवस्ती आहे. स्वच्छतागृहे अत्यंत गलिच्छ असल्याने कितीही घाईची लघुशंका आली, तरी या ठिकाणी जाता येणे शक्य नाही. यातही महिलांसाठी खूप कमी प्रमाणात स्वच्छतागृह असून, अस्वच्छता आणि घाणीमुळे महिलांना तेथे जाता येत नाही, असेच दृश्य आहे. तळजाई टेकडीवरच्या जंगलातील स्वच्छतागृहे बऱ्यापैकी स्थितीत आहेत, काही स्वच्छतागृह येथे नव्याने तयार केली आहेत. मात्र, या भागातील दाट लोक वस्तीत गेल्यावर स्वच्छतागृहे अधिक घाण झाल्याची दिसतात. तिथे साफसफाई आणि स्वच्छता अगदी नावालाच आहे. तिथे जाताना उलटी झाल्याशिवाय राहत नाही इतकी घाण आहे. त्याचे फोटो देखील काढण्याची हिंमत होत नाही, इतकी गलिच्छ आणि घाण स्वच्छतागृहे शहराच्या कानाकोपऱ्यात असून, पर्वती भागही त्यातून सुटलेला नाही.

सारसबागेच्या दोन्ही कोपऱ्यांतील स्वच्छतागृहे स्वच्छ

सारसबागेतील दोन्ही कोपऱ्यातील स्वच्छतागृहे मात्र व्यवस्थित आहेत. दक्षिण कोपऱ्यातील स्वच्छतागृह स्वच्छ आहे, तर उत्तर कोपऱ्यातील स्वच्छतागृहाची किंचित डागडुजी आणि स्वच्छता नीट केली, तर येथे अधिक सोयीचे होईल. कारण, या ठिकाणी सकाळी फिरण्यासाठी ज्‍येष्ठ नागरिक मोठ्या संख्येने येतात. लक्ष्मीनगर भागातील स्वच्छतागृह अत्यंत गलिच्छ आहेत. या भागात रस्त्यावर दाटीवाटीने दुकाने आणि झोपडपट्टीचा भाग मोठ्या प्रमाणात आहे, तेथील महापालिकेची सार्वजनिक स्वच्छतागृहे अतिशय घाण आहेत, ती वर्षानुवर्षी तशीच आहेत, त्याकडे कोणाचीही लक्ष नाही.

दुरून चकाचक, आत दुर्गंधी

कर्वे रस्त्यावर मृत्युंजयेश्वर मंदिराजवळ असलेले स्वच्छतागृह हे दुरून छान व चकाचक दिसते. परंतु, आत गेल्यानंतर तेथील अस्वच्छता जीव मुठीत धरायला लावते. त्यामुळेच रस्त्यावरील टपरीचालक, फुलवाले, फुगेवाले व्यावसायिक त्याचा वापर करण्याऐवजी थेट नाल्यात नैसर्गिक विधी करताना दिसतात. इतकेच नव्हे, तर सकाळी या परिसरातील पदपथावरून फिरणाऱ्यांना नाक मुठीत धरून फिरावे लागते. अनेक वेळा या परिसरात झाड्याच्या आडोशाला बसून भिकाऱ्यांनी नैसर्गिक विधी उरकलेले दिसतात.

नळस्टॉप चौकातील सार्वजनिक मुतारी मात्र त्यातल्या त्यात बरी म्हणावी लागेल. या मुतारीची स्वच्छता तुलनेने खूपच चांगली आहे. त्यामुळे या रस्त्यावरून जाणारे रिक्षाचालक, दुचाकीस्वार येथे थांबून या मुतारीचा वापर करताना दिसतात. एका खासगी बांधकाम व्यावसायिकाने ही मुतारी दत्तक घेतली असून, त्यांच्या वतीने तिची नियमित स्वच्छता केली जाते. तसेच, या मुतारीवर बसविलेल्या पाण्याच्या टाकीत दररोज पाणी भरले जात असल्याने मुतारी व आसपासचा परिसर स्वच्छ ठेवला जातो. तथापि, येथील पान व्यावसायिक व अन्य पदार्थांचे हॉटेल चालकांनी या मुतारीच्या मागेच टाकाऊ पदार्थ टाकण्याच्या कुंड्या ठेवल्या असल्याने मुतारीच्या मागील बाजूस मात्र अस्वच्छता असल्याचे दिसते.

बाहेर रंगरंगोटी, आत मात्र घाणीचे साम्राज्य

सिंहगड रस्त्यावरील अत्यंत गजबजलेल्या विठ्ठलवाडी चौकातील सार्वजनिक स्वच्छतागृहाची दुरवस्था झाली असून, प्रशासनाच्या ढिसाळ कारभाराचा नमुनाच येथे पाहायला मिळत आहे. शनिवारी (दि. २५) या स्वच्छतागृहाची पाहणी केली असता, बाहेरून चमकदार अन् टकाटक दिसणारे हे स्वच्छतागृह आतून मात्र अस्वच्छ आहे. घाण पाणी तुंबलेले राहत असल्याने ते आरोग्यास घातक ठरत आहे. रस्त्यावरून जाताना हे स्वच्छतागृह अतिशय सुस्थितीत आणि ''टकाटक'' दिसते. मात्र, प्रत्यक्षात आत पाऊल ठेवताच दुर्गंधीचा सामना करावा लागतो.

स्वच्छतागृहातील ड्रेनेज व्यवस्था पूर्णपणे कोलमडली असून, सर्व भांडी तुंबलेली पाहायला मिळाली. आत मधील पाईप्स, नळ आणि इतर वस्तू पूर्णपणे तुटलेल्या अन् नादुरुस्त अवस्थेत आहेत. स्वच्छतागृहाच्या भिंती अन् कोपरे गोवा-मावा, गुटखा खाणाऱ्या बेजबाबदार व्यक्तींनी पिचकाऱ्या मारून प्रचंड घाण करून ठेवल्याचे शनिवारी केलेल्या पाहणीत आढळून आले. नियमित सफाई होत नसल्याने परिसरात रोगराई पसरवणारी दुर्गंधी पसरली असून, आत जाणे म्हणजे आजारांना आमंत्रण देण्यासारखे झाले आहे.

सिंहगड रस्त्यावरून रोज हजारो नागरिक, वाहनचालक, प्रवासी आणि पादचारी ये-जा करतात. विठ्ठलवाडी चौकात हे स्वच्छतागृह अत्यंत महत्त्वाचे मानले जाते. मात्र, 'बाहेरून गोंडस अन् आतून कचरा' अशा अवस्थेमुळे नागरिकांची मोठी गैरसोय होत आहे.

‘स्वच्छ पुण्या’त २४ सार्वजनिक स्वच्छतागृहे नादुरुस्त

'स्वच्छ शहर, सुंदर शहर'चा दावा करणाऱ्या महापालिकेच्या सार्वजनिक स्वच्छतागृहांची वास्तवस्थिती मात्र अत्यंत विदारक असल्याचे समोर आले आहे. शहरात एकूण ६२८ सार्वजनिक स्वच्छतागृहे असली, तरी येरवडा-वडगाव शेरी क्षेत्रीय कार्यालयाच्या हद्दीतील २४ स्वच्छतागृहे नादुरुस्त आहेत, तर कोंढवा-उंड्री परिसरातील एक सार्वजनिक स्वच्छतागृह पूर्णपणे बंद आहे. त्यामुळे स्वच्छतेच्या दाव्यांवरच प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.

महापालिकेचे आरोग्य विभाग, संबंधित क्षेत्रीय कार्यालये, कंत्राटदार आणि केअरटेकर यांच्या माध्यमातून सार्वजनिक स्वच्छतागृहांची देखभाल केली जात असल्याचा दावा प्रशासनाकडून केला जातो. मात्र, नगरसेवक प्रसनजित वैरागे यांनी विचारलेल्या प्रश्नाच्या उत्तरातून अनेक स्वच्छतागृहांची दुरवस्था महापालिकेलाच मान्य करावी लागली आहे. येरवडा-वडगाव शेरी क्षेत्रीय कार्यालयाच्या अखत्यारीतील ५६ सार्वजनिक स्वच्छतागृहांपैकी तब्बल २४ स्वच्छतागृहे नादुरुस्त असल्याची माहिती प्रशासनाने दिली आहे. या स्वच्छतागृहांच्या दुरुस्तीसाठी वरिष्ठ कार्यालयाकडे प्रस्ताव पाठविल्याचे सांगण्यात आले असले, तरी प्रत्यक्ष दुरुस्ती कधी होणार? याबाबत कोणतीही स्पष्ट मुदत देण्यात आलेली नाही. कोंढवा-उंड्री क्षेत्रीय कार्यालयाच्या हद्दीतील एका स्वच्छतागृहाला कुलूप लागल्याचेही उत्तरात नमूद करण्यात आले आहे. महापालिका बहुतांश ठिकाणी नियमित स्वच्छता केली जात असल्याचा दावा करीत असली, तरी अनेक स्वच्छतागृहांमध्ये घाणीचे साम्राज्य, दुर्गंधी, अपुरा पाणीपुरवठा, तुटलेली साधनसामग्री आणि देखभालीचा अभाव, यामुळे नागरिकांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे. त्यामुळे शहरातील मूलभूत नागरी सुविधांच्या व्यवस्थापनावरच प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. महापालिकेच्या अधिकृत उत्तरातूनच सार्वजनिक स्वच्छतागृहांच्या देखभालीतील त्रुटी समोर आल्याने 'स्वच्छ पुणे'च्या घोषणांपेक्षा प्रत्यक्षात नागरिकांना दर्जेदार सुविधा कधी मिळणार? असा प्रश्न उपस्थित होत आहे.

क्षेत्रीय कार्यालयनिहाय सार्वजनिक स्वच्छतागृहांची स्थिती

क्षेत्रीय कार्यालय स्वच्छतागृहे - विशेष बाब

  • ढोले-पाटील १३४ - महापालिकेकडून देखभाल

  • येरवडा-वडगाव शेरी ५६- २४ नादुरुस्त

  • नगर रोड-वाघोली २२- केअरटेकर/मनपा कर्मचारी

  • शिवाजीनगर-घोले रोड ३२- आरोग्य विभागाकडून देखभाल

  • औंध-बाणेर ९- आरोग्य विभागाकडून देखभाल

  • कोथरूड-बावधन ७१- कंत्राटदारामार्फत स्वच्छता

  • वारजे-कर्वेनगर १५- मनपा व संस्थेमार्फत स्वच्छता

  • सिंहगड रस्ता ६०- कंत्राटदारामार्फत देखभाल

  • धनकवडी-कात्रज-आंबेगाव १४- केअरटेकरमार्फत देखभाल

  • कोंढवा-उंड्री ५- एक स्वच्छतागृह बंद

  • वानवडी-रामटेकडी २६- मनपा व कंत्राटदारामार्फत देखभाल

  • बिबवेवाडी ४५- सर्व सुरू

  • कसबा पेठ ३०- दिवसातून दोनवेळा स्वच्छता

  • विश्रामबागवाडा ४४- दिवसातून दोनवेळा स्वच्छता

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT