पुणे: महापालिकेने मिळकत कराच्या गणनेसाठी वापरल्या जाणाऱ्या वाजवी भाडे दरांमध्ये वाढ करण्याचा निर्णय घेतला आहे. 1 एप्रिलपासून हे नवे दर लागू होणार आहेत. महाराष्ट्र महानगरपालिका अधिनियमाच्या प्रकरण 8, नियम 7 नुसार दरमहा प्रति चौरस फुटाच्या वाजवी भाडे दरांमध्ये सरसकट 5 टक्के वाढ करण्यात येणार असून, यास महापालिका आयुक्तांनी प्रशासकीय मान्यता दिली आहे. या निर्णयामुळे नव्याने कर आकारणीस येणाऱ्या निवासी तसेच बिगर निवासी मिळकतींवर सुधारित दरांनुसार कर आकारला जाणार आहे, अशी माहिती मिळकत कर विभागाचे प्रमुख रवी पवार यांनी दिली.
महापालिकेच्या कर आकारणीसाठी शहरातील एकूण 53 विभागांतील 600 भागांमध्ये निवासी व बिगर निवासी मिळकतींचे वाजवी भाडे दर निश्चित केले आहेत. यामध्ये निवासी इमारती (आरसीसी, लोड बेरिंग, साधे पत्राशेड), बिगर निवासी इमारती (आरसीसी, लोड बेरिंग, साधे पत्राशेड), कार्यालये, व्यापारी तत्त्वावर वापरल्या जाणाऱ्या मोकळ्या जागा, केवळ मोकळ्या जागा तसेच निवासी व बिगर निवासी पार्किंग या प्रकारांचा समावेश आहे. सध्या 1 एप्रिल 2025 ते 31 मार्च 2026 या कालावधीसाठी लागू असलेल्या वाजवी भाडे दरांमध्ये 1 एप्रिलपासून सरसकट 5 टक्क्यांची वाढ करण्यात येणार आहे.
महापालिका आयुक्तांनी या वाढीस प्रशासकीय मान्यता दिली आहे. या निर्णयामुळे 1 एप्रिलपासून नव्याने कर आकारणीसाठी येणाऱ्या सर्व मिळकतींवर ही सुधारित वाजवी भाडे दर लागू होणार आहे. ज्या मिळकतींवर अद्याप कर आकारणी झालेली नाही, ज्या ठिकाणी वाढीव बांधकाम करण्यात आले आहे, मोकळ्या जागांचा वापर सुरू आहे किंवा मिळकतींच्या वापरात बदल झाला आहे, अशा सर्व मिळकतींची माहिती नागरिकांनी महापालिकेला देऊन त्यांची कर आकारणी करून घ्यावी.रवी पवार, मिळकत कर विभाग प्रमुख, महापालिका